चित्रपट निर्मात्याच्या फ्लॅटमधील सतरा लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश

चोरीव्या मुद्देमालासह दोघांना अटक तर तिसर्‍याचा शोध सुरु

0

अरुण सावरटकर
१५ सप्टेंबर २०२६
मुंबई, – चित्रपट निर्माता आरेन मोरेस कायरो यांच्या अंधेरीतील बंद फ्लॅटमध्ये प्रवेश करुन सुमारे सतरा लाखांच्या मुद्देमालाच्या चोरीचा पर्दाफाश करण्यात वर्सोवा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. राहुल सदाशिव मुदाने आणि अरमान कुर्बानअली शाह अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मालाड व अंधेरीतील रहिवाशी आहे. त्यांच्याकडून पोलिसांनीी चोरीचा सुमारे पंधरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इरफान शेख याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

ही घटना २६ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अंधेरीतील वर्सोवा, सातबंगला, नाना-नानी पार्कजवळील त्रिशुल सहकारी सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक १०१ मध्ये आरेन कायरो हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून ते चित्रपट निर्माता आहेत. त्यांच्याकडे प्रिया आणि सुनिता नावाच्या दोन महिला घरकाम करतात. २३ ऑगस्टला त्यांची पत्नी आशिया ही सुट्टीसाठी व्हिएतनाम येथे गेली होती. पत्नीनंतर ते स्वत २६ ऑगस्टला दुपारी अडीच वाजता व्हिएतनामला निघून गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा व्यवस्थित बंद केला होता. ५ सप्टेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता ते त्यांच्या पत्नीसोबत घरी आले होते. यावेळी त्यांना बेडरुममधील लाकडी कपाटाचा दरवाजा तुटलेला दिसला. त्यामुळे त्यांनी कपाटातील सामानासह दागिन्यांची पाहणी केली होती.

यावेळी त्यांना कपाटातील तीन लाखांची हिर्‍याची अंगठी, वीस हजाराची एक सोन्याची अंगठी, साठ हजाराचे भारतीय, ४३ हजाराचे ४३० युरो, एक लाख अकरा हजाराचे सिंगापूर, तीन लाखांचा रोलेक्स घड्याळ, एक लाख ऐंशी हजाराची बारा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, पन्नास हजार रुपयांची पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ४ लाख ९५ हजार रुपयांची ३४ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, एक लाख साठ हजाराची सोन्याची ब्रेसलेट असा सुमारे सतरा लाख एकोणीस हजाराचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यांनी कपाटासह घरात दागिन्यासह इतर मुद्देमालाचा शोध घेतला, मात्र त्यांना कुठेच ते सापडले नाही.

त्यांच्या घरी कोणीही नसताना अज्ञात व्यक्तीने प्रवेश करुन हा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच आरेन कायरो यांनी वर्सोवा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल वर्सोवा पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता.

ही शोधमेाहीम सुरु असताना सीसीटिव्ही फुटेज आणि आणि तांत्रिक माहितीवरुन राहुल मुदाने आणि अरमान शाह या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्यांनीच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. यातील राहुल हा मालाडच्या हरबादेवी मंदिराजवळील मढ-कोळीवाडा तर अरमान शाह हा अंधेरीतील आरटीओ लेन, सुरेशनगरमध्ये राहतो. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन सोन्याची चैन, मंगळसूत्र, ब्रेसलेट, सहा हजार सातशे रुपयांचे भारतीय चलन, रोलेक्स कंपनीचा घड्याळ, ४३० युरो चलन, एक हिर्‍याची अंगठी असा १४ लाख ८४ हजाराचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. उर्वरित २ लाख ३४ हजाराचा मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे.

अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोटार्रत हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या दोघांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का, त्याने अशाच प्रकारे इतर ठिकाणी घरफोडी केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. या गुन्ह्यांत इरफान शेख याचा सहभाग उघडकीस आला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page