मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 मार्च 2025
मुंबई, – पतीसमोरच 25 वर्षांच्या भावी पत्नीला एका वाहनाने चिरडल्याची घटना भोईवाडा परिसरात घडली. या अपघातात निकिता भैरु दळवी या तरुणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर चालक पळून गेल्याने त्याचा सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस शोध घेत आहेत. निकिताचे तक्रारदार संदीप कृष्णा कुट्टे याच्यासोबत फेब्रुवारी महिन्यांत साखरपुडा झाला होता आणि 7 मेला या दोघांचा विवाह होणार होता असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे निकिताच्या अपघाती निधनाने कुट्टे आणि दळवी कुटुंबियांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे.
हा अपघात सोमवारी 3 मार्चला सायंकाळी साडेसात वाजता भोईवाडा येथील डॉ. बी. ए रोड, हिंदमाता ब्रिजच्या दक्षिण वाहिनीवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. संदीप कृष्णा कुट्टे हा सायन-प्रतिक्षानगर परिसरात राहत असून तो मूळचा कोल्हापूरचा रहिवाशी आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो त्याच्या वडिलांसोबत सायन येथे राहतो. एका खाजगी ट्रॅव्हेल्स कंपनीत संदीप कामाला आहे. 23 फेब्रुवारीला त्याचे निकिता भैरु दळवी या 25 वर्षांच्या तरुणीसोबत साखरपुडा झाला होात. निकीता ही कांजूरमार्ग येथे राहत असून ती लोअर परेल येथील एका टेक्सटाईल्स कंपनीत कंपनीत काम करते. 7 मेला त्यांचा लग्न होणार होता.
सोमवारी 3 मार्चला तो तिला भेटण्यासाठी तिच्या लोअर परेल येथील कार्यालयात गेला होता. तेथून ते दोघेही त्याच्या अॅक्टिव्हा बाईकवरुन तिला तिच्या कांजूरमार्ग येथील घरी सोडण्यासाठी जात होते. ही बाईक भोईवाडा येथील डॉ. बी. ए रोडवरील हिंदमाता ब्रिजवरुन उतरत असताना अचानक त्यांची बाईक स्लिप झाली. त्यामुळे ते दोघेही बाईकवरुन खाली पडले. याच दरम्यान मागून येणार्या वाहनाने निकिताला धडक दिली होती. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या निकिताला पोलिसांनी तातडीने केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला रात्री पावणेनऊ वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याप्रकरणी संदीप कुट्टे याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून एका तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर चालक पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. प्राथमिक तपासात रस्त्यावर ऑईल पडल्याने संदीपची बाईक स्लीप झाली आणि त्याच दरम्यान मागून आलेल्या एका वाहनाने त्याच्यासमोरच त्याच्या भावी पत्नीला चिरडले.