बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक
बाईक चोरीच्या पाच गुन्ह्यांची उकल करुन पाचही बाईक जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 एप्रिल 2026
मुंबई, – बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगाराला चारकोप पोलिसांनी अटक केली. मोहम्मद रईस शमशुल्ला शहा असे या 23 वर्षीय गुन्हेगाराचे नाव असून तो मालाडच्या मालवणीतील रहिवाशी आहे. त्याच्या अटकेने पाच बाईक चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून चोरीच्या पाचही बाईक पोलिसांनी हस्तगत केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांनी सांगितले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
विराट पुष्पेंद्र गौतम हा 25 वर्षांचा तरुण बोरिवलीतील गोराई, यशोधन सोसायटीमध्ये राहतो. 7 जून 2024 रोजी त्याने त्याची बाईक कांदिवलीतील चारकोप, सेक्टर क्रमांक पाच, पवनसूत्र सोसायटीजवळ पार्क केली होती. रात्री उशिरा ही बाईक अज्ञात व्यक्तीने चोरी करुन पलायन केले होते. दुसर्या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच त्याने चारकोप पोलिसांत बाईक चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बाईक चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गेल्या काही वर्षांत उत्तर मुंबईतील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात बाईक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती.
त्याची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत सर्वच पोलीस ठाण्यात अशा बाईक चोरी करणार्या गुन्हेगाराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त निता पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण, पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू थोरात, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब पवार, पोलीस हवालदार बाजीराव कराटे, स्वप्निल शिंदे, धनश्याम पाटेकर, पोलीस शिपाई सुदेश गायकवाड, आदित्य राणे यांनी तपास सुरु केला होता.
3 मे 2026 रोजी संबंधित पथक रात्रीच्या वेळेस गस्त घालत होते. यावेळी या पथकाला कांदिवलीतील चारकोप, भाबरेकरनगर परिसरात दोन तरुण एक बाईक ढकलत नेत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे बाईकविषयी विचारणा केल्यानंतर त्यांनी ती बाईक मालाडच्या मालवणी परिसरात राहणार्या मोहम्मद रईस याची असल्याचे सांगितले. चौकशीदरम्यान ही बाईक चोरीची असल्याचे उघडकीस आले होते. ही बाईक ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी मोहम्मद रईसचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना मोहम्मद रईसला मालवणी परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची पोलिसांनी चौकशी केली असता तो बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील रेकार्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. गेल्या दोन वर्षांत त्याने चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच बाईक चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या अटकेने पाचही बाईक चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याकडून 1 लाख 95 हजाराच्या पाचही चोरीच्या बाईक पोलिसांनी हस्गत केल्या आहेत.
अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मोहम्मद रईस हा मालाडच्या मालवणीतील अंबजुवाडी परिसरात राहत असून दिवसा रेकी करुन रात्रीच्या वेळेस बाईक चोरी करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.