बिटकॉईनच्या नावाने शेअर विक्रेत्याला घातला दिड कोटींना गंडा
अपहारासह फसवणुकीप्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – बोगस कंपनी स्थापन करुन बिटकॉईन देतो असे सांगून एका शेअर विक्रेत्याची सहाजणांच्या टोळीने सुमारे दिड कोटीची फसवणुक केल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आले आहे. याप्रकरणी सहाही आरोपीविरुद्ध वांद्रे पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. अबुर सोडे, धनजीभाई रावरिया, जिशान शेख, इंद्रजीत लतिफ, आर. अब्दुल लतिफ आणि रामकुमार धर्मक अशी या सहाजणांची नावे आहेत. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच सहाही आरोपी पळून गेले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
योगेश प्रकाश मोरे हे परळच्या जी. डी आंबेकर, मारवाडी परिसरात राहतात. त्यांचा स्वतचा शेअर खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांची आरोपीशी ओळख झाली होती. या ओळखीत त्यांनी त्यांची फ्रिप्टेक्स फिनसोल नावाची एक कंपनी असल्याचे सांगून त्यांना बिटकॉईन हे अभासी चलन उपलब्ध करुन देतो असे सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांच्याकडून बिटकॉईन खरेदीचा निर्णय घेतला होता. नोव्हेंबर २०२१ ते ऑक्टोंबर २०२४ त्यांनी बीटकॉईनसाठी त्यांच्या कंपनीसह विविध बँक खात्यात कॅश स्वरुपात ४२ लाख तर धनादेशद्वारे १ कोटी ८ लाख रुपये असे सुमारे दिड लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. एक ते दिड वर्ष उलटूनही त्यांनी त्यांना बीटकॉईन दिले होते. याबाबत विचारणा केल्यानंतर ते सर्वजण त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. गेल्या तीन वर्षांत त्यांनी बिटकॉईन दिले नाही किंवा बिटकॉईनसाठी घेतलेले पैसेही परत केले नाही.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी संबंधित आरोपीची चौकशी सुरु केली होती. यावेळी त्यांनी सुरु केलेली कंपनी बोगस असल्याचे उघडकीस आले. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी बिटकॉईन देतो असे सांगून त्यांची सुमारे दिड कोटीची फसवणुक केली होती. हा प्रकार झाल्याचे लक्षात येताच योगेश मोरे यांनी वांद्रे पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अबुर सोडे, धनजीभाई रावरिया, जिशान शेख, इंद्रजीत लतिफ, आर. अब्दुल लतिफ आणि रामकुमार धर्मक या सहाजणांविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून सहाही आरोपींची लवकरच पोलिसाकडून चौकशी होणार आहे.