मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ डिसेंबर २०२४
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका कारच्या धडकेने विजय बनारसीलाल शुक्ला या ४४ वर्षांच्या पे ऍण्ड पार्क कर्मचार्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी अपघाताची नोद करुन कारचालक प्रबोधन विनायक बेळेकर याला अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा अपघात गुरुवारी सायंकाळी पावणेआठ वाजता सांताक्रुज येथील कालिना, सीएसडी रोड, इनसिंनिया या इमारतीच्या तळमजला, पे ऍण्ड पार्किंगमध्ये घडली. राहुल अनुजप्रसाद सिंह हा मूळचा उत्तरप्रदेशच्या हंडियाचा रहिवाशी असून सध्या सांताक्रुज परिसरात राहतो. त्याच्यासोबत विजयसह इतर तीनजण राहतात. ते दोघेही एका खाजगी कंपनीसाठी पे ऍण्ड पार्कचे काम करत असून त्यांच्यासोबत इतर सहकारी तिथे कामाला आहेत. गुरुवारी सकाळी आठ वाजता विजय हा नेहमीप्रमाणे दिवसपाळीच्या ड्यूटीवर हजर झाला होता. सायंकाळी पावणेआठ वाजता तो पार्किंगच्या काऊंटर या ठिकाणी गाड्यांचे पार्किंगसह पैसे घेण्याचे काम करत होता. यावेळी त्याच्यासोबत तिथे इतर दोन चालक होते. याच दरम्यान तिथे एक कार भरवेगात आली होती. या कारचालकाला अंदाज न आल्याने त्याने विजय बसलेल्या ठिकाणी जोरात धडक दिली होती. त्यानंतर ही कार समोरच्या भिंतीवर आदळली.
या अपघातात विजयला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तिथे उपस्थित चालकांनी तातडीने जवळच्या गुरुनानक हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच बीकेसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी राहुल सिंह याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मारुती स्विफ्ट कारचा चालक प्रबोधन बेळेकर याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून पे ऍण्ड पार्कचे काम करणार्या कर्मचार्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला जामिनावर सोडून देण्यात आले. प्रबोधन हा वरळीतील पोतदार हॉस्पिटलजवळील आनंदाश्रम अपार्टमेंटमध्ये राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.