मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ जानेवारी २०२५
मुंबई, – चारपट परवाव्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकासह तिघांची सुमारे तीन कोटीची फसवणुक झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या पाच संचालकाविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन सांधीर, निमिश गुप्ता, श्वेता कटारिया, नितीन ठाकूर आणि मोहित जुनेजा अशी या पाचजणांची नावे असून ते सर्वजण जेनलिप इकोसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. या कंपनीत अनेकांना मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केल्याने फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. दरम्यान गुन्हा दाखल होताच पाचही संचालक पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
अनिमेश संजय शर्मा हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत वांद्रे येथे राहतात. त्यांची एक पेट्रोकेमिकल ट्रान्सपोर्ट कंपनी असून याच कंपनीत ते गेल्या पंधरा वर्षांपासून संचालक म्हणून काम करतात. ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांच्या एका मैत्रिणीने त्यांना दिल्लीतील जेनलिप इकोसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची माहिती दिली होती. ही कंपनीने अमेरिकेच्या शेअरमार्केटमध्ये आयपीओ लिस्टींग करण्यास सुरुवात केली असून कंपनीला आर्थिक गुंतवणुक करणार्या गुंतवणुकदाराची गरज आहे. ही कंपनी डीएनए सायन्स वापरुन पर्सनेलिटी रिपोर्ट तयार करण्याचे काम करते. त्यामुळे शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व आणि योग्यता समजून घेण्यास व शिक्षणासह करिअरची निवड करण्यास मदत होते.
या कंपनीत गुंतवणुक केल्यास वर्षांला चारपट परतावा मिळतो असे सांगितले होते. या कंपनीची माहिती घेण्यासाठी त्यांनी सचिन सांधीर यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी त्याने त्यांना कंपनीच्या गुंतवणुक योजनेची माहिती सांगितल होती. त्यांच्या कंपनीत प्रतिष्ठित, नामांकित तसेच उद्योग क्षेत्राशी संबंधित अनेक लोकांनी गुंतवणुक केल्याचे सांगून त्यांची एक यादीच त्यांना कंपनीच्या वेबसाईटच्या माध्यमातून दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता.
या वेबसाईटची माहिती घेतल्यानंतर त्यात अनेकांनी गुंतवणुक केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. या गुंतवणुकदारांनी किती रुपये गुंतवणुक केली याची नाव व फोटोसहीत देण्यात आली होती. त्यानंतर कंपनीच्या संचालकासोबत एक-दोन मिटींग घेतल्यानंतर त्यांनी कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांच्यात गुंतवणुकीसंदर्भात एक करार झाला होता. या करारानंतर त्यांनी कंपनीत दोन कोटीची गुंतवणुक केली होती. दोन कोटीचा धनादेश दिल्यानंतर त्यांना कंपनीकडून आठ कोटीचा धनादेश देण्यात आला होता. त्यांच्यासह त्यांची आई रामोला शर्मा हिनेही कंपनीतील शेअरमध्ये गुंतवणुक केली होती.
९५ लाख रुपयांचे ३४ हजार ३०६ शेअर खरेदी केले होते. याबाबत त्यांच्यातही एक करार झाला होता. या शेअर गुंतवणुकीनंतर त्यांच्या आईला ३ कोटी ८० लाखांचा एक आगाऊ धनादेश देण्यात आला होता. फेब्रुवारी २०२४ पासून कंपनीने त्यांच्या कर्मचार्यांना वेतन देणे बंद केले होते. त्यात नितीन ठाकूर आणि निमिश गुप्ता यांनी त्यांचा संचालक पदाचा अचानक राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांनी सचिन सांधीरकडे चौकशीसाठी कॉल केला, मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे त्यांनी कंपनीने दिलेले धनादेश बँकेत टाकले होते, मात्र ते दोन्ही धनादेश बँकेत न वटता परत आले होते.
गुंतवणुकीवर चार पट परतावा देण्याच्या आमिषाने कंपनीच्या संचालकानी त्यांच्यासह त्यांची आई रामोला शर्मा, मित्र महेश खैरनार यांची तीन कोटी सात लाखांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सचिन सांधीर, निमिश गुप्ता, श्वेता कटारिया, नितीन ठाकूर आणि मोहित जुनेजा या पाचजणांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक, महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कंपनीत अनेकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.