बॉम्बच्या अफवेने मुंबई-दिल्ली विमानात तणावाचे वातावरण
अंधेरीतील ५५ वर्षांच्या आरोपी प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ ऑगस्ट २०२६
मुंबई, – बॅगेची तपासणीदरम्यान बॉम्ब असल्याचे सांगितल्यांतर रविवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी मुंबईहून दिल्लीला जाणार्या सर्व प्रवाशांना खाली उतरविण्यात आले आणि संपूर्ण विमानासह प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान काहीही आक्षेपार्ह वस्तू न सापडल्याने रात्री उशिरा या विमानाला टेकऑफची परवानगी देण्यात आली. बॉम्बची खोटी माहिती सांगून तणावाचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी अनुज जयराम सुवर्णा या ५५ वर्षांच्या आरोपी प्रवाशाला सहार पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ओमप्रकाश राजाराम राजभर हे गोरेगाव येथे राहत असून सध्या एका खाजगी एअरवेज कंपनीत सहाय्यक सिक्युरिटी मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांच्या एअरवेज विमानातून प्रवास करणार्या प्रवाशांचे तिकिट चेक करणे, विमान चेक करणे, प्रवाशांच्या बॅग तपासून पाहणे, विदेशातून आलेल्या प्रवाशांच्या बॅगा बेल्टपर्यंत सुरक्षित पोहचवणे आदी त्यांच्या कामाची जबाबदारी आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता ते आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांच्यसोबत सुरक्षा अधिकारी रविंद्र राहुल रोकडे होते. रात्री आठ वाजता त्यांच्या कंपनीचे विमान मुंबईहून दिल्लीला जाणार होते. त्यामुळे ते विमानातील सर्व प्रवाशांच्या बॅगा तपासून पाहत होते.
सायंकाळी साडेसात वाजता तिथे एक प्रवाशी आला. यावेळी रविंद्र रोकडे यांनी त्याला बॅगेतून माचिस, लायटर, सिजर, नेलकेटर, लिक्वीड, स्प्रे आदी वस्तू कॅरी करत आहेत का याबाबत विचारणा केली. यावेळी या प्रवाशाने बॅगेत बॉम्ब असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी ही माहिती ओमप्रकाश राजभर यांच्यासह इतर सुरक्षार अधिकार्यांना दिली. या माहितीनंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेनंतर विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. संपूर्ण विमानासह प्रवाशांची सामानाची तपासणी करण्यात आली होती. त्यात या अधिकार्यांना काहीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. त्यानंतर या विमानाला दिल्लीला उड्डाण करण्यास परवानगी देण्यात आली.
दुसरीकडे या घटनेनंतर संबंधित प्रवाशाला त्याच्या बॅगेसह सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी त्याच्या बॅगेची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर त्यातही काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडले नाही. त्याची चौकशी केल्यानंतर त्याचे नाव अनुज सुवर्णा असल्याचे उघडकीस आले. तो एका खाजगी कंपनीत कामाला असून सध्या अंधेरीतील वर्सोवा-यारी रोड, लिला अपार्टमेंटमध्ये राहतो.
बॅगेत बॉम्ब असल्याचे सांगितल्यामुळे मुंबई-दिल्ली विमानाला टेकऑफ घेण्यास उशीर झाला होता. त्याच्यामुळे इतर प्रवाशांसह विमानतळावरील सुरक्षारक्षकांना नाहक त्रास सोसावा लागला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध सहार पोलिसांनी बॉम्बची खोटी माहिती सांगून तणावाचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याची चौकशी करुन नोटीस देऊन सुटका करण्यात आली. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज चाळके यांनी दुजोरा दिला आहे.