टँकरच्या धडकेने बाईकस्वारासह तरुणीचा जागीच मृत्यू

बोरिवलीतील अपघात; टॅकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ एप्रिल २०२४
मुंबई, – भरवेगात जाणार्‍या एका टँकरची बाईकला धडक लागून झालेल्या अपघातात बाईकस्वारासह त्याच्या मागे बसलेल्या एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये राहुल राधेश कृष्णन (२५) आणि जया अरुण पांडे (२४) यांचा समावेश असून ते दोघेही भाईंदरचे रहिवाशी आहेत. याप्रकरणी आरोपी टँकरचालक अजमल हुसैन अन्सारी याच्याविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी हलगर्जीपणाने टँकर चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

हा अपघात रविवारी दुपारी सव्वादोन वाजता बोरिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, नॅशनल पार्क ब्रिजच्या दक्षिण वाहिनीवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रविवारी परिसरात गस्त घालणार्‍या कस्तुरबा मार्ग पोलिसांना नॅशनल पार्क ब्रिजवर अपघात झाल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून प्राप्त झाली होती. त्यामुळे संबंधित पोलीस घटनास्थळी रवाना झाले होते. तिथे गेल्यानंतर पोलिसांना एका केमिकल टँकरने बाईकला धडक दिल्याचे दिसून आले.या अपघातात बाईकस्वारासह तरुणी गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे या दोघांना प्रथम मिरारोडच्या ऑर्बिट आणि नंतर पंडित भीमसेन जोशी सामन्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या दोघांनाही तिथे डॉक्टरांनी मृत घेाषित केले होते. त्यांच्याकडील कागदपत्रांवरुन त्यांची नावे राहुल कृष्णन आणि जया पांडे असल्याचे उघडकीस आले. राहुल हा भाईदरच्या साई पार्क तर जया ही भाईंदरच्या नवघर रोड, हनुमाननगर परिसरात राहत होती. या दोघांच्या अपघाताची मृत्यूची माहिती नंतर त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली होती.

अपघातानंतर आरोपी टँकरचालक अजमल अन्सारी हा स्वतहून पोलीस ठाण्यात हजर झाला होता. याप्रकरणी पोलीस शिपाई अनिल मोतीराम कांबळे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अजमलविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. प्राथमिक तपासात भरवेगात टँकर चालविण्याच्या प्रयत्नात अजमलचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि त्याने बाजूने जाणार्‍या एका बाईकला धडक दिली होती. त्यात राहुल आणि जया यांचा मृत्यू झाला होता. अजमल हा चेंबूरच्या वाशीनाका, लक्ष्मीनगरचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page