अपंग व्यक्तीच्या नावाने बोगस दस्तावेज तयार करुन फसवणुक
1.95 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 मार्च 2025
मुंबई, – मानसिक व शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या व्यक्तीसह त्यांच्या वडिलांच्या नावाने बोगस दस्तावेज बनवून बँकेतून कर्जासह टर्म लोन आणि कॅश क्रेडिट घेऊन 1 कोटी 95 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध बोरिवली पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पंकज किशोर शाह आणि रुपाली पंकज शाह अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.
उर्वी राजीव शाह ही महिला बोरिवलीतील महाराष्ट्रनगर, सुचिता एनक्लेव्ह अपार्टमेटमध्ये राहत असून याच अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर तिच्या मालकीचे दोन फ्लॅट आहेत. तिचे पती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग आहेत. त्यामुळे ते कुठलेही निर्णय घेऊ शकत नाही. कुठलाही व्यवसाय करु शकत नाही. ही बाब माहिती असताना पंकज आणि त्यांची पत्नी रुपाली शाह यांनी 2 मे 2015 ते 12 फेब्रुवारी 2025 या कालावधीत उर्वी यांच्या सासर्याचे बोगस स्वाक्षरी घेतल्या होत्या. तसेच तिचे पती राजीव शाह यांच्या नावाने बँकेतून 1 कोटी 95 लाख रुपयांचे कर्ज, टर्म लोन आणि कॅश क्रेडिट घेतले होते. या पैशांचा स्वतच्या फायद्यासाठी वापर करुन उर्वी आणि तिचे पती राजीव शाह यांची फसवणुक केली होती.
इतकेच नव्हे तर पंकज आणि रुपाली यांनी त्यांच्या नावाने बँकेत बोगस खाते उघडून कर्जाची सर्व रक्कम याच खात्यात ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर या पैशांचा परस्पर अपहार करुन ही फसवणुक केली होती. हा प्रकार अलीकडेच उर्वी शाह हिच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर तिने संबंधित बँकेसह बोरिवली पोलिसांना घडलेला प्रकार सागून पंकज आणि रुपाली शाह यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत बोरिवली पोलिसांना दोषी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पंकज शाह आणि रुपाली शाह या दोघांविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन बँकेतून कर्जासह कॅश क्रेडिट घेऊन 1 कोटी 95 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांची चौकशी होणार असल्याने त्यांना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.