मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ मे २०२४
मुंबई, – मॉर्निंग वॉकसाठी जात असताना अशोक खुपसरे या निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्ताच्या गळ्यातील सुमारे दोन लाखांची चैन चोरी करुन पळून गेलेल्या दोन संशयितांना डी. एन नगर पोलिसांनी अटक केली आहे. जेनम केवलीत लिंकज आणि विवेक कृष्ण राव अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या गुन्ह्यांतील चोरीचा मुद्देमाल अद्याप हस्तगत करण्यात आला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
७८ वर्षांचे अशोक वसंतराव खुपसरे हे अंधेरीतील जुहू-वर्सोवा लिंक रोड, गुरुकुलजवळील संगम सोसायटीमध्ये राहतात. २००५ साली ते महाराष्ट्र पोलीस दलातून सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत. २४ एप्रिल २०२४ रोजी ते नेहमीप्रमाणे सकाळी साडेसहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी घरातून निघाले होते. रस्त्यावरुन चालत असताना संगम सोसायटीसमोरच एका बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणाने त्यांच्या गळ्यातील दोन लाखांची रुद्राक्ष मणी असलेली, त्यात पुखराज स्टोन, देवीचे, मोत्याचे लॉकेटचे चैन चोरी करुन पलायन केले होते. या झटापटीत अशोक खुपसरे हे खाली पडल्याने त्यांना बाईकचा क्रमांक पाहता आला नाही. त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार डी. एन नगर पोलिसांना सांगितला होता. त्यांच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी पळून गेलेल्या दोन्ही आरोपीविरुद्ध ३९२, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मच्छिंदर यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. तीन दिवसांपूर्वी याच गुन्ह्यांत पोलिसांनी जेनम आणि विवेक या दोघांनाही संशशित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.