कंपनीत गुंतवणुकीच्या नावाने मैत्रिणीची ३५ लाखांची फसवणुक
एक महिन्यांपासून फरार असलेल्या मित्राला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ जुलै २०२४
मुंबई, – इंदौर येथे सुरु करण्यात आलेल्या कंपनीत गुंतवणुकीच्या नावाने मैत्रिणीची सुमारे ३५ लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या आरोपी मित्राला अखेर विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. बिरजू जयेंद्र शुक्ला असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
४१ वर्षांची तक्रारदार महिला विलेपार्ले येथे तिच्या पती आणि मुलीसोबत राहत असून एका खाजगी कंपनीत नोकरी करते. २६ वर्षांपूर्वी ती ए प्लस इंडिया या कंपनीत कामाला होती. तिथेच तिची ओळख बिरजू शुक्लाशी झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही व्हॉटअप आणि कॉलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. जानेवारी २०२३ रोजी बिरजूने तिला मॅसेज करुन विलेपार्ले येथे भेटायला बोलाविले होते. त्यामुळे ती त्याला भेटण्यासाठी गेली होती. या भेटीदरम्यान त्याने तिला त्याची नोकरी गेल्याचे सांगून त्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे त्याला आता नोकरीमध्ये रस नसून स्वतचा व्यवसाय सुरु करायचा आहे असे सांगून इंदौर शहरात एक कंपनी सुरु करणार असल्याचे सांगितले होते. या कंपनीत त्याने तिला पार्टनरशीप ऑफर केली होती. यावेळी तिने तिच्या पतीशी बोलून सांगते असे सांगितले होते. काही दिवसांनी ती तिच्या पतीसोबत बिरजूला भेटण्यासाठी आली होती. यावेळी त्याने त्यांना कंपनीबाबतची सविस्तर माहिती सांगितली. सुरुवातीला गुंतवणुक म्हणून ५० ते ६० लाखांची गरज असल्याचे सांगून गुंतवणुकीवर टक्केवारी काढून होणार्या नफ्याची रक्कमेची विभागणी करु असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्या कंपनीत गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता.
६ मार्च ते २ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तिने बिरजूच्या बेरीबून कंपनीसाठी ३३ लाख ५० हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यासाठी तिने तिच्या मित्रांसह बॉसकडून काही पैसे उसने घेतले होते. ही रक्कम घेतल्यानंतर त्याच्याकडून कंपनीबाबत काहीच विचारणा होत नव्हती. त्यामुळे तिने त्याला संपर्क साधला असता त्याने कंपनीचे काम सुरु आहे असे सांगितले. गुंतवणुकीनंतर त्यांच्यात करार होणार होता, मात्र करार करण्यास बिरजू तिला भेटत नव्हता. कंपनीबाबत काहीही माहिती न देता मिळणार्या नफ्याबाबत त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने त्याच्याशी असलेले पार्टनरशीप तोडण्याचा निर्णय घेतला होता. तसे तिने त्याला कळवून त्याच्याकडून गुंतवणुक केलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने तिला पैसे दिले नाही किंवा कंपनीचा जमा-खर्चाचा हिशोब दिला नाही. बिरजूकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच तिने विलेपार्ले पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बिरजू शुक्लाविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२० भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच बिरजू हा पळून गेला होता, त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच त्याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने त्याच्या मैत्रिणीची फसवणुक करुन तिने दिलेल्या पैशांच्या स्वतच्या वैयक्तिक फायद्यासाठी वापर केल्याची कबुली दिली आहे.