25 लाखांच्या हेव्ही डिपॉझिटचा अपहार करुन फसवणुक
फसवणुकीच्या गुन्ह्यांत रुममालकाला तीन महिन्यांनी अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 जानेवारी 2026
मुंबई, – सुमारे 25 लाख रुपयांच्या हेव्ही डिपॉझिटचा अपहार करुन एका खाजगी शिक्षिकेची फसवणुक केल्याप्रकरणी वालन सिलवई अॅन्थोनी नाडार या आरोपी रुममालकाला तीन महिन्यानंतर धारावी पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चोकशी सुरु आहे. वालनने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
34 वर्षांची तक्रारदार महिला थेनमोली सुब्रमणी वॅनियर ही धारावीच्या ट्रॉन्झिंट कॅम्पमध्ये तिच्या आई-वडिलांसोबत राहते असून खाजगी शिकवणी घेते. ऑक्टोंबर 2022 रोजी तिचे रामकुमार वॅनिअरशी लग्न झाले होते. लग्नानंतर ती तामिळनाडू येथे गेली होती, मुंबईत खाजगी क्लासेस घ्यायचे असल्याने ती तामिळनाडू येथून मुंबईत शिफ्ट झाली होती. याच क्लासेससाठी ती नवीन जागेचा शोध घेत होती. याच दरम्यान तिची वालन नाडारशी ओळख झाली होती. त्याने तिला त्याच्या मालकीचा धारावीतील 90 फिट रोड, साईबाबा नगर येथे दोन रुम असल्याचे सांगितले. दुसर्या आणि तिसर्या मजल्यावरील दोन्ही रुम तिला खाजगी क्लासेससाठी हेव्ही डिपॉझिटवर देण्याचे आश्वासन दिले होते.
चर्चेअंती त्यांच्यात तीन वर्षांसाठी 25 लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर दोन्ही रुम देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे त्यांच्यात एक करार झाला होता. या करारानंतर तिने वालन नाडारला चार टप्यात 25 लाख रुपये धनादेश आणि कॅश स्वरुपात दिले होते. काही दिवसांनी ती तिच्या भावाच्या लग्नासाठी तामिळनाडू येथे गेली होती. काही दिवसांनी तिने क्लासेससाठी रुमचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी वालनने तिला रंगकाम करुन रुम देतो असे सांगितले.
याच दरम्यान त्याने तिच्या वडिलांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत एक नवीन करार बनवून त्यांची स्वाक्षरी घेतली होती. त्यानंतर क्लासेसससाठी दिलेले दोन्ही रुम त्याने परस्पर दुसर्या व्यक्तीला भाड्याने दिले होते. या भाड्याची रक्कम वालन नाडार तिच्या वडिलांना देत होता. वालनसोबतचा व्यवहार न पटल्याने तिने जून 2025 रोजी तिने तिच्या डिपॉझिटची मागणी सुरु केली होती, यावेळी त्याने तीन महिन्यांत डिपॉझिटची 25 लाखांची रक्कम देण्याचे आश्वासन दिले, मात्र वारंवार मागणी करुनही त्याने तिला ही रक्कम परत केली नाही तसेच भाड्याची रक्कम देणेही बंद केले होते.
याबाबत थेनमोली वॅनियरने त्याच्याकडे पैशांचा तगादा सुरु केला होता. यावेळी त्याने तिच्यासह तिच्या वडिलांना धमकी दिली होती. अशाच प्रकारे हेव्ही डिपॉझिटवर दोन रुम देतो असे सांगून वालन नाडारने कराराप्रमाणे तिला रुमचा ताबा दिला नाही. रुममध्ये भाडेकरु ठेवून तिच्या हेव्ही डिपॉझिटचा अपहार करुन तिची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तिने त्याच्याविरुद्ध धारावी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर वालन नाडारविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तीन महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.