मालक नसताना फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन फसवणुकं

शिक्षिकेला दहा लाखांना गंडा घालणार्‍या आरोपी दलालास अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 एप्रिल 2026
मुंबई, – मालक नसताना फ्लॅट खरेदी विक्रीचा व्यवहार करुन एका 35 वर्षांच्या शिक्षिका महिलेची सुमारे दहा लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी बलराम अमरदेव पोखारीवाला नावाच्या आरोपी दलालास समतानगर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत विमल विठ्ठल नागरे, अलका गोरक्षनाथ दिघे, चंदा रोहिदास वाकचोरे, नंदा भाऊसाहेब वर्धे, मनिषा अशोक वर्पे, राजू बेलू पल्लर आणि प्रियांका कल्पेश दिघे असे सातजण सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील राजू आणि बलराम कटातील मुख्य आरोपी आहेत तर इतर सहाही महिलांनी शिक्षिकेच्या घरात घुसून तिचे सामान घरातून बाहेर काढण्यास या दोघांना मदत केली होती.

रेणू राजेंद्र यादव ही तक्रारदार महिला कांदिवली येथे तिच्या पती आणि दोन मुलांसोबत राहते. ती एका खाजगी शाळेत शिक्षिका आहे तर तिचे पती रिक्षाचालक म्हणून काम करतात. पूर्वी ती कांदिवलीतील दामूनगर परिसरात राहत होती. 2021 रोजी तिच्या परिचित व्यक्तीने तिला एक फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगून तिची ओळख बलराम पोखारीवाला आणि राजू पल्लरशी करुन दिली होती. या दोघांनी तिला कांदिवलीतील जिवलापाडा, स्वप्नपूर्वी एसआरए इमारतीच्या 304 क्रमांकाचा फ्लॅट दाखविला होता. या फ्लॅट ते स्वत मालक असल्याची बतावणी करुन त्यांना फ्लॅटची 25 लाखांमध्ये विक्री करायची आहे असे सांगितले होते. तिला फ्लॅट विकत घ्यायचा होता, त्यामुळे फ्लॅटची पाहणी केल्यानंतर तिने तो फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला होता.

सर्व बोलणी झाल्यानंतर तिने राजूला नोव्हेंबर 2021 ते मार्च 2022 या कालावधीत दहा लाखांचे पेमेंट केले होते. मे 2022 रोजी त्यांनी तिला फ्लॅटचा ताबा दिला. यावेळी या दोघांनी तिला काही दिवसांत फ्लॅटचे कागदपत्रे तिच्या नावावर करण्याचे आश्वान दिले होते. मात्र वारंवार कॉल करुन राजू आणि बलराम यांनी तिच्या कॉलला प्रतिसाद दिला नाही. चौकशीअंती तिला ते दोघेही फ्लॅटमालक नसून दलाल म्हणून काम करत असल्यासचे सांगितले. त्यामुळे तिने फ्लॅटमालकाची माहिती काढण्यास सुरुवात केली, मात्र सोसायटीने तिला फ्लॅटमालकाची माहिती दिली नाही. जानेवारी 2026 रोजी तिच्या घरी तीनजण आले, त्यापैकी एका व्यक्तीने त्याचे नाव कल्पेश दिघे असल्याचे सांगून तो फ्लॅट त्याच्या वडिलांच्या मालकीचा असल्याचे सांगितले. याच दरम्यान तिने पैसे घेऊन राजू आणि बलराम यांनी फ्लॅट तिच्यावर नावावर न केल्याने त्यांच्याविरुद्ध समतानगर पोलिसांत तक्रार केली होती.

चौकशीदरम्यान कल्पेशने त्यांच्या वडिलांनी राजू आणि बलरामला कधीही फ्लॅट विक्रीबाबत सांगितले नव्हते. त्यांनी फ्लॅटमध्ये भाडेकरु ठेवण्याबाबत चर्चा केली होती. पोलीस ठाण्यात कल्पेशची जबानी नोंदवून घेतल्यानंतर तिने या दोघांविरुद्ध कारवाईसाठी वकिलांशी चर्चा सुरु केली होती. ही चर्चा सुरु असताना 27 मार्चला तिच्या घरी राजू, बलरामसह इतर काहीजण आले होते. त्यांनी तिच्या घरात प्रवेश करुन सर्व सामान बाहेर काढले. या घटनेची माहिती प्राप्त होताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

यावेळी रेणू यादवच्या घरी घुसलेल्या सहाही महिलांना पोलिसांनी पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणले होते. तपासात त्यांची नावे अलका दिघे, विमल नागरे, चंदा वाकचोरे, नंदा वर्धे, प्रियांका दिघे, मनिष वर्पे असल्याचे उघडकीस आले. यातील अलका व प्रियांका या दोघी कांदिवली तर इतर चार महिला अहमदनगर, संगमनेर, शिरापूरच्या रहिवाशी होत्या. प्राथमिक तपासात बलराम आणि राजू हे दोघेही फ्लॅटचे मालक नव्हते, तरीही त्यांनी फ्लॅटचे मालक असल्याचे सांगून रेणू यादवशी फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन तिने दिलेल्या पैशांचा परस्पर अपहार केला.

ती रक्कम मूळ फ्लॅमालकांना नंतर तिच्यासह फ्लॅटमालकाची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच या दोघांसह सहाही महिलांविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत पळून गेलेल्या बलराम पोखारीवाला याला तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page