79 लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील मुख्य वॉण्टेड आरोपीस अटक

रेल्वेच्या टेंडरच्या नावाने डॉक्युमेंट्री फिल्म व्यावसायिकाची फसवणुक

0

अरुण सावरटकर
16 एप्रिल 2026
मुंबई, – रेल्वेचे टेंडरच्या नावाने एका डॉक्युमेंटी फिल्म बनविणार्‍या व्यावसायिकाची 79 लाखांची फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका मुख्य वॉण्टेड आरोपीस चारकोप पोलिसांनी अटक केली. अरविंदकुमार मुरलीधर श्रीवास्तव असे या आरोपीचे नाव असून तो दिल्लीच्या गाझियाबादचा रहिवाशी आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता, अखेर नऊ महिन्यानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत त्याच्यासोबत संतोषकुमार श्रीवास्तव, मलिक ऊर्फ संजय जैन आणि विवेक श्रीवास्तव असे तिघेही सहआरोपी आहेत. या टोळीने विविध शासकीय टेंडरच्या नावाने इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विनोदकुमार शिवशंकर शुक्ला हे घाटकोपरचे रहिवाशी असून ते डॉक्युमेंट्री फिल्म बनवितात. संतोषकुमार हा त्यांचा परिचित असून तो कांदिवलीतील चारकोप परिसरात राहत होता. तो संगीतकार असल्याने त्यांच्यात गेल्या वीस वर्षांपासून मैत्री होती. अरविंदकुमार हा त्याचा भाऊ असून नाशिक येथील त्र्यंबकेश्वरमध्ये म्युझिक अल्बमच्या शूटींगदरम्यान त्यांची अरविंदकुमारशी ओळख झाली होती. फेब्रुवारी 2020 रोजी संतोषकुमारने त्यांना कॉल करुन त्याचा भाऊ अरविंदकुमार हा दिल्लीतील गाजियाबादचा रहिवाशी असून त्याचे सर्वच क्षेत्रांच्या बड्या प्रतिष्ठित व्यक्तीसह सरकारी अधिकार्‍यांशी चांगली ओळख आहे. त्याच्या माध्यमातून काम घेतल्यास त्यांना चांगला फायदा होईल. आरएलडीएची मुंबईत मोठी जागा विवेक श्रीवास्तव हा शासकीय अधिकारी अरविंदकुमारचा मित्र आहे.

ते दोघेही वर्गमित्र असल्याने त्यांना ही जागा सरकारकडून 49 किंवा 99 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर मिळेल. या जागेवर बिल्डरच्या माध्यमातून तिथे एक मोठा प्रोजेक्ट सुरु करता येईल. त्यातून त्यांना चांगला फायदा होईल असे सांगितले. इतकेच नव्हे तर विवेक श्रीवास्तवच्या मदतीने बॉटल स्टाँड, ब्लेकेंट, चादर, उशी आदी रेल्वे सप्लाय करण्याचे कंत्राट मिळू शकते. त्यासाठी त्यांना रेल्वेमध्ये आधी रजिस्ट्रेशन करुन वेंडर व्हावे लागेल. याकामी अरविंदकुमार हा त्यांना मदत करणार असून त्यासाठी काही रक्कम खर्च करावे लागेल असे सांगितले. त्याचा प्रस्ताव चांगला होता, त्यामुळे विनोदकुमार शुक्ला यांनी गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. हा प्रकार त्यांनी त्यांचे पार्टनर धर्मेद्र कोठारी आणि महेश शुक्ला यांना सांगितला. त्यात त्यांच्यात रेल्वेचे रजिस्ट्रेशन करुन वेंडर बनायचे आणि नंतर रेल्वेचे कंत्राट मिळवून रेल्वेला ब्लेकेंट, चादर उशीसह इतर वस्तूचा पुरवठा करायचा याबाबत एकमत झाले होते.

रेल्वेचे सभासद होण्यासाठी त्यांनी त्यांना बारा लाख रुपये दिले होते. त्यानंतर त्यांना विविध कारणासाठी बँक ट्रान्स्फरसह कॅश स्वरुपात पेमेंट करण्यात आले होते. अशा प्रकारे काही महिन्यांत विनोदकुमार शुक्ला यांनी अरविंदकुमार, संतोषकुुमार, मलिक ऊर्फ संजय जैन आणि विवेक श्रीवास्तव यांना 95 लाख 50 हजार रुपये दिले होते. या पेमेंटनंतर त्यांनी त्यांना रेल्वेचे टेंडर मिळल्याचे ऑर्डर रिसीट कॉपी दिली. मूळ कॉपी दोन दिवसांत मिळणार असून त्यात त्यांना संबंधित वस्तू कुठे पाठवायचे याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल असे सांगितले. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना मूळ कॉपी, रेल्वे टेंडरसंदर्भातील दस्तावेज दिले नाही. विचारणा केल्यानंतर ते सर्वजण वेगवेगळे कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी संबंधित टेंडरची रिसीट कॉपीची शहानिशा केली होती, त्यात त्यांना संबंधित कॉपी बोगस असल्याचे उघडकीस आले.

या चौघांकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. सतत पैशांची मागणी केल्यानंतर त्यांनी त्यांना सोळा लाखांचे पेमेंट केले, मात्र उर्वरित 79 लाख 50 हजाराचा परस्पर अपहार करुन त्यांच्यासह त्यांच्या दोन्ही पार्टनरची फसवणुक केली होती. या घटनेनंतर त्यांनी कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र संपूर्ण आर्थिक व्यवहार कांदिवलीतील चारकोप परिसरात झाला होता, त्यामुळे त्यांचा तक्रार अर्ज चारकोप पोलिसांकडे पाठविण्यात आला होता. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अरविंदकुमार श्रीवास्तव, संतोषकुमार श्रीवास्तव, संजय जैन आणि विवेक श्रीवास्तव अशा चारही आरोपींविरुद्ध चारकोप पोलिसांनी रेल्वेच्या टेंडरच्या नावाने पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी पळून गेले होते. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना दोन दिवसांपूर्वी यातील मुख्य आरोपी अरविंदकुमार श्रीवास्तवला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने फसवणुकीच्या उद्देशाने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर अरविंदकुमारला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

दिल्लीतील बड्या व्यक्तीसह शासकीय अधिकार्‍यांशी चांगले संबंध असल्याची बतावणी करुन त्यांना त्यांच्याकडे मोठमोठी टेंडर मिळवून देतो असे सांगून गंडा घालणारी ही टोळी असून या टोळीने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. पोलीस कोठडीत असलेल्या अरविंदकुमारची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page