लग्नास नकार दिला म्हणून अश्लील फोटो-व्हिडीओ काढले
मैत्रिणीच्या विनयभंगप्रकरणी आरोपी मित्राला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ मे २०२४
मुंबई, – लग्नास नकर दिला म्हणून रागाच्या भरात मैत्रिणीचे अश्लील फोटोसह व्हिडीओ काढून तिचा मानसिक शोषण करुन विनयभंग झाल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच गोविंदकुमार लक्ष्मण कामत या २५ वर्षांच्या आरोपी मित्राला गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी माटुंगा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
२५ वर्षांची तक्रारदार तरुणी दादर येथे राहत असून तिथेच ती घरकाम करते. याच ठिकाणी गोविंदकुमार हा जेवण बनविण्याचे काम करतो. एकाच ठिकाणी काम करत असल्याने त्यांची चांगली मैत्री झाली होती. या मैत्रीनंतर गोविंदकुमार तिच्या प्रेमात पडला होता. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. त्यामुळे त्याने तिला प्रपोज करुन लग्नाची मागणी घातली होती. मात्र तिने त्याला लग्नास नकार दिला होता. त्याचा गोविंदकुमारला प्रचंड राग होता. १ फेब्रुवारी ते २६ मे २०२४ या कालावधीत त्याने रागाच्या भरात तिचे काही अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढले होते. या फोटोसह व्हिडीओवरुन तो तिचा मानसिक शोषण करत होता. त्याच्या शोषणाला कंटाळून तिने माटुंगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी गोविंदकुमारविरुद्ध ३५४ क भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गोविंदकुमारला प्रभारी पोलीस निरीक्षक इंद्रजीत मोरे यांच्या पथकाने दादर येथून अटक केली. चौकशीत त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी माटुंगा पोलिसांकडे सोपविण्यात आले. त्याला बुधवारी लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याच्याकडून त्याचा पोलिसांनी जप्त केला असून या मोबाईलमध्ये तक्रारदार तरुणीचे काही अश्लील फोटो आणि व्हिडीओ असल्याचे दिसून आले आहे.