मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा जवळचा सहकारी डी. के राव याच्यासह त्याचे दोन सहकारी अनिल सिंग आणि मिमित घुटा या दोघांना शनिवारी किल्ला कोर्टाने सोमवार 13 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एका बिल्डरला खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी या तिघांवर शुक्रवारी रात्री अटकेची कारवाई झाली होती. अटकेनंतर त्यांना पोलीस बंदोबस्तात किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशीसाठी या तिघांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
दोन बिल्डरच्या आर्थिक व्यवहारात एका बिल्डरला डी. के राव याने खंडणीसाठी धमकी दिली होती. रावचा परिचित बिल्डरला त्याची गुंतवणुक रक्कम परत करण्याची तसेच त्याला खंडणी देण्यासाठी ही धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर भयभीत झालेल्या या बिल्डरने गुन्हे शाखेत धाव घेतली होती. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डी. के रावसह इतर आरोपीविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच विशेष सेशन कोर्टात सुनावणीसाठी आलेल्या रावला गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर पोलिसांनी अनिल सिंग आणि मिमिट घुटा या दोघांना अटक केली होती. अटकेनंतर या तिघांनाही शनिवारी दुपारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने रावसह दोघांनाही सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.