डिजीटल अरेस्टची भीती दाखवून वयोवृद्धांची ४१ लाखांची फसवणुक

खाजगी कंपनीच्या नावाने बँक खाती पुरविणार्‍या दुकलीस अटक

0

अरुण सावरटकर
१७ जून २०२६
मुंबई, – मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अरेस्टची भीती दाखवून एका वयोवृद्धाची सुमारे ४१ लाखाची फसवणुक केल्याप्रकरणी एका दुकलीस उत्तर प्रादेशिक सायबर सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. रमेश घेवाराम माली आणि रतना काना राम अशी या दोघांची नावे असून गुन्ह्यांतील सायबर ठगांना त्यांनी फसवणुकीसाठी खाजगी कंपनीच्या नावाने बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मानसी लवाटे ही ६७ वर्षांची वयोवृद्ध महिला तिचे पती जयप्रकाशसोबत मालाडच्या मालेदारवाडी परिसरात राहते. २०१७ साली ती आर्थिक विकास महामंडळ या निमशासकीय विभागातून तर तिचे पती जयप्रकाश २०१० साली महानगरपालिकेतून निवृत्त झाले आहेत. ८ एप्रिलला ती तिच्या घरी होती, यावेळी तिला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तिच्याविरुद्ध मनी लॉड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही माहिती ऐकताच तिला धक्का बसला, त्यामुळे तिने तो कॉल तिच्या पतीला दिला, तोपर्यंत तो कॉल कट झाला होता. काही वेळानंतर तिला एक व्हिडीओ कॉल आला होता. तिने कॉल रिसीव्ह केल्यानंतर समोर एक व्यक्ती पोलीस गणवेशात होता. त्याने स्वतची ओळख पोलीस निरीक्षक आकाश शर्मा असल्याचे सांगून त्यांना समोर बसण्यास सांगितले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या बँक खात्यात अडीच कोटी जमा झाले असून ती रक्कम मनी लॉड्रिुंगची आहे.

त्यांचा विश्‍वास बसावा म्हणून त्यांनी त्यांच्या बँक खात्याचे स्टेटमेंट पाठविले होते. याच गुन्ह्यांत त्यांना डिजीटल अरेस्ट करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी तपासात सहकार्य करण्यास सांगून त्यांची चौकशी सुरु केली होती. त्यांच्या बँक खात्यासह इतर प्रॉपटीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. समोरील व्यक्ती खरोखरच पोलीस समजून त्यांनी तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शवून त्यांचा या संपूर्ण प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांंगितले. यावेळी त्याने त्यांच्या संपूर्ण प्रॉपटीसह बँक खात्यातील रक्कमेची चौकशी होणार आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे सर्व एफडी बंद करुन ती रक्कम बचत खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यामुळे दुसर्‍या मानसी आणि जयप्रकाश यांनी बँकेत जाऊन त्यांचे सर्व एफडी बंद करुन ती रक्कम त्यांच्या बचत खात्यात ट्रान्स्फर केली होती. यावेळी बँक कर्मचार्‍यांनी त्यांच्याकडे विचारणा केली होती,

मात्र संबंधित पोलिसांनी याबाबत कोणाशी काहीही बोलण्यास मज्जाव केल्याने त्यांनी त्यांना काहीही माहिती सांगितली नाही. घरी आल्यानंतर आकाश शर्माने पुन्हा त्यांची चौकशी केली होती. त्यांच्या बँक खात्यातील रक्कम त्याने दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगितले. चौकशीतून ते दोघेही निर्दोष असल्याचे उघडकीस येताच त्यांना त्यांची रक्कम परत पाठविली जाईल असे सांगितले. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी दिलेल्या बँक खात्यात ४१ लाख ५० हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. याच दरम्यान त्यांचे दिर त्यांच्या घरी आले होते. घडलेला प्रकार त्यांनी त्यांना सांगितला. यावेळी त्यांनी त्यांना त्यांची सायबर ठगांकडून फसवणुक झाल्याचे सांगून त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधिताविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यांत वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या पथकाकडून तपास सुरु होता. तपासात फसवणुकीची काही रक्कम दोन वेगवेगळ्या बँक खात्यात जमा झाली होती. या बॅक खात्याची माहिती काढल्यानंतर ते खाते रमेश माली आणि रतना राम यांच्या मालकीच्या व्ही आर ट्रेडिंग कंपनीचे असल्याचे उघडकीस आले. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांना वसई येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ते दोघेही वसई परिसरात राहत असून लेबर व्यावसायिक म्हणून काम करतात. चौकशीत त्यांनीच फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याची कबुली दिली.

त्यांच्या बँक खात्यात जमा होणारी रक्कम त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. याकामी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन प्राप्त झाले होते. महाराष्ट्रातील अठरासह संपूर्ण भारतातील ७८ बँक खाती याआधीच पोलिसांनी गोठविले आहेत. याच बँक खात्यात वेगवेगळ्या गुन्ह्यांतील रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चौकशीत आलेल्या माहितीनंतर या दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यांचयकडून पोलिसांनी दोन मोबाईलसह दोन सिमकार्ड जप्त केले आहे. अटकेनंतर त्यांना मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page