विलेपार्ले-गोरेगाव येथील अपघातात वयोवृद्धेसह महिलेचा मृत्यू

जखमी दोघांवर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ जून २०२६
मुंबई, – विलेपार्ले आणि गोरेगाव येथील दोन अपघातात एका वयोवृद्धेसह दोन महिलांचा मृत्यू झाला तर अन्य दोनजण जखमी झाले. मृतांमध्ये रेहाना मोहम्मद बाकीर काचवाला आणि किंजल हिरेन शाह या दोन महिलांचा तर जखमींमध्ये निर्मला दोजिया आणि प्रेमजी दोजिया यांचा समावेश आहे. दोन्ही जखमींवर गावडे या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी वनराई आणि विलेपार्ले पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

पहिला अपघात सोमवारी दुपारी साडेतीन वाजता गोरेगाव येथील सर्व्हिस रोड, आरे चेकनाक्याच्या दिशेने जाणार्‍या मुस्लिम कब्रस्तानसमोर झाला. अमीना खान अली काचवाला ही ६६ वर्षांची वयोवृद्ध महिला वसई येथे एकटीच राहत असून तिची विवाहीत मुलगी राजस्थानात राहते. ती जेवण बनविण्याचे काम करत असून त्यातून तिचा उदरनिर्वाह चालतो. सोमवारी मोहरम असल्याने ती तिची वहिनी रेहाना काचवाला हिला भेटण्यासाठी तिच्या गोरेगाव येथील मोतीनगर नगर, इंद्रप्रस्थ रेजेन्सी अपार्टमेंटमध्ये गेली होती. सोमवारी ती रेहाना आणि तिची नात मरियम असे तिघेही गोरेगाव येथील आरे चेकनाक्याजवळील मुस्लिम कब्रस्तान येथे आईच्या कबरीवर फुल टाकून प्रार्थना करण्यासाठी आले होते.

प्रार्थना करुन ते तिघेही मुस्लिम कब्रस्तानसमोरुन रस्ता क्रॉस करत होते. यावेळी भरवेगात जाणार्‍या एका कारने रेहानाला जोरात धडक दिली होती. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. तिच्या डोक्याला, कपाळाला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तिला जवळच्या द्वारका मल्टिस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता रेहानाला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अपघाताची माहिती मिळताच वनराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अमीना खान हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारचालक साहिल सुनिल कारंडे याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून एका वयोवृद्ध महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर तोच रेहानाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता. मात्र हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर तो तेथून पळून गेला होता.

दुसरा अपघात अत्यंत गजबजलेला आणि वर्दळीचा परिसर म्हणून ओळख जाणार्‍या विलेपार्ले रेल्वे स्थानकाजवळील एस. व्ही खांडेकर रोडवर झाला. बुधवारी सायंकाळी एका इलेक्ट्रीक कारने तीन वाहनांना धडक दिली. या अपघातात किंजल हिरेन शाह या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर निर्मला दोजिया आणि प्रेमजी दोजिया असे दोनजण जखमी झाले. विलास गव्हाणकर हा त्याच्या इलेक्ट्रीक कारने विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होता.

ही कार सायंकाळी साडेचार वाजता व्ही एस. खांडेकर रोडवरुन जात असताना अचानक त्याचा कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने तिथे उभ्या असलेल्या तीन वाहनांना जोरात धडक दिली. त्यात किंजल शाह, निर्मला दोजिया आणि प्रेमजी दोजिया असे तीनजण जखमी झाले. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या गावडे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे किंजल शाह हिला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर इतर दोघांवर उपचार सुरु करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते. या अपघातात कारसह इतर तिन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले होते. अपघातामुळे परिसराची वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच विलेपार्ले पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांनी काही वेळात वाहतूक सेवा पूर्वपदावर केली. याप्रकरणी विलास गव्हाणकर याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून एका महिलेच्या मृत्यू तर इतर दोघांना गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कार चालविताना त्याने मद्यप्राशन केले होते का याचा तपास सुरु आहे. त्याची मेडीकल होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page