फसवणुकीच्या गुन्ह्यांतील हिरे परत मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणुक
नवी मुंबईच्या पोलीस हवालदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ जून २०२६
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांतील अद्याप हस्तगत न झालेले सुमारे ७५ लाख रुपयांचे हिरे परत मिळवून देतो असे सांगून एका व्यावसायिक पिता-पूत्राची पोलीस हवालदाराने साडेपंधरा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रविण शामराव कुंडलकर या पोलीस हवालदाराविरुद्ध अंधेरी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तो सध्या नवी मुंबईतील मोटार परिवहन विभागात कार्यरत आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे.
सूर्याजी तुकाराम सोनावणे हे हिरे व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत सायन परिसरात राहतात. त्यांचा हिरे एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. चार वर्षांपूर्वी त्यांची रवी जैन नावाच्या एका हिरे व्यापार्याने सव्वाकोटीच्या हिर्यांची फसवणुक केली होती. याबाबत त्यांनी डी. बी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर रवी जैनविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्याला या गुन्ह्यांत अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी ५० लाखांचे हिरे हस्तगत केले, मात्र उर्वरित ७५ लाख रुपयांचे हिरे अद्याप हस्तगत करण्यात आले नव्हते. काही महिन्यानंतर रवी जैन हा जामिनावर बाहेर आला होता.
याच संदर्भात त्यांचा मुलगा रुपेश सोनावणे त्यांचा वकिल सदीप पारेख यांच्या कार्यालयात आला होता. यावेळी तिथे त्याची प्रविण कुंडलकरशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान त्यांच्यात रवी जैनविषयी चर्चा झाली होती. त्याच्याकडून त्यांना अद्याप ७५ लाखांचे हिरे प्राप्त झाले नसल्याचे रुपेशने प्रविणला सांगितले होते. त्याने तो आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करुन त्यांना उर्वरित ७५ लाख रुपयांचे हिरे मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्याने त्याच्याकडे पंधरा लाखांची मागणी केली होती. रुपेशने ही माहिती नंतर त्याचे वडिल सूर्याजी सोनावणे यांना सांगितली. ७५ लाखांचे हिरे परत मिळत असल्याने त्यांनी प्रविणला पंधरा लाख रुपये देण्याचे मान्य केले होते.
मार्च ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत त्यांनी प्रविणला टप्याटप्याने साडेपंधरा लाख रुपये दिले होते. या पेमेंटनंतर त्याने त्यांना दोन ते तीन महिन्यांत उर्वरित ७५ लाखांचे हिरे परत करण्याचे आश्वासन दिले, मात्र त्याने त्याचे आश्वासन पाळले नाही. विचारणा केल्यानंतर तो त्यांना टाळत होता. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने पोलिसांना दिलेले पैसे परत मिळत नसतात, त्यामुळे पैशांसाठी पुन्हा कॉल करु नकोस, नाहीतर आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.
चौकशीदरम्यान प्रविण कुंडलकर हा कोणीही पोलीस अधिकारी नसून तो नवी मुंबईतील मोटार परिवहन विभागात पोलीस हवालदार म्हणून काम करतो. फसवणुकीच्या उद्देशाने त्याने सूर्याजी सोनावणे आणि त्यांचा मुलगा रुपेश यांना हिरे परत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून साडेपंधरा लाख घेऊन त्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी अंधेरी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून प्रविण कुंडलकर याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून प्रविणची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.