सीसीटिव्ही नसलेल्या ठिकाणी रिक्षा चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

साडेआठ लाखांच्या बारा चोरीच्या रिक्षासह दोघांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ जून २०२६
मुंबई, – सीसीटिव्ही कॅमेरा नसलेल्या ठिकाणी पार्क केलेल्या रिक्षा चोरी करणार्‍या एका टोळीचा खेरवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीशी संबंधित दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. मोहम्मद इक्बाल सिरताजअली शेख ऊर्फ लकी आणि मोहम्मद फरीद मिराजअली हाश्मी अशी या दोघांची नावे असून त्यांच्या अटकेने बाराहून अधिक रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या दोघांनी खेरवाडी, विलेपार्ले, वाकोला, निर्मलनगर हद्दीतून चोरीचे केलेल्या सुमारे साडेआठ लाखांच्या बारा रिक्षा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

गेल्या काही महिन्यांत पश्‍चिम उपनगरातून रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांत प्रचंड वाढ झाली होती. याबाबत विविध स्थानिक पोलीस ठाण्यात रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे नाहीत अशाच ठिकाणी पार्क केलेल्या रिक्षा चोरी होत असल्याचे तपासात उघडकीस आले होते. या घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त निमित गोयल यांनी गंभीर दखल घेत झोनच्या सर्वच पोलीस ठाण्यात संबंधित गुन्हेगारांना अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. प

रिसरातील काही सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर त्यात दोन संशयित आरोपी चोरीची रिक्षा घेऊन जाताना दिसून आले. त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते दोघेही पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार मोहम्मद इक्बाल आणि मोहम्मद फरीद असल्याचे उघडकीस आले. या माहितीनंतरर सहाय्यक पोलीस आयुक्त संजय गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप लोंढे, पोलीस हवालदार तातोबा मोरे, गणेश सावंत, गणेश ठोंबरे, श्याम ठाकरे, पोलीस शिपाई समीर कांबळे, महेश पाटील यांनी वाकोला पाईपलाईन परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून मोहम्मद इक्बाल आणि मोहम्मद फरीद या दोघांना अटक केली.

चौकशीत ते दोघेही वांद्रे येथील महाराष्ट्रनगर, गल्ली क्रमांक २५ मध्ये राहतात. मोहम्मद इक्बाल हा गाडी वाशिंगचे काम करतो तर मोहम्मद फरीद हा मजुर आहे. चालू वर्षांत या दोघांनी बाराहून अधिक रिक्षाची चोरी केल्याची कबुली दिली. त्यापैकी खेरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच, निर्मलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन, विलेपार्ले आणि वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी दोन अशा बारा रिक्षा चोरी केल्याचे सांगितले.

सीसीटिव्ही कॅमेरे नसलेल्या ठिकाणाची रेकी करुन तिथे पार्क केलेले रिक्षा ते दोघेही चोरी करत होते. चोरीची रिक्षा एका कंन्स्ट्रक्शन साईटवर ठेवून रिक्षातील पार्टस काढून ती रिक्षा निर्जनस्थळी लपवून पळून जात होते. त्यांच्याकडून चोरीच्या बारा रिक्षा हस्तगत करण्यात आल्या आहेत. या रिक्षाची किंमत साडेआठ लाख रुपये इतकी आहे. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या दोघांना इतर पोलीस ठाण्याच्या रिक्षा चोरीमध्ये सहभाग उघडकीस आल्याने त्यांचा ताबा संबंधित पोलिसांकडून घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page