डोगरीतील बालसुधारगृहात राडा करुन पोलीस शिपायावर हल्ला
भांडणात मध्यस्थी केली म्हणून हल्ला केल्याचे तपासात उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून डोंगरीतील बालसुधारगृहात काही अल्पवयीन मुलांमध्ये प्रचंड राडा घालून कर्तव्य बजाविणार्या अनिकेत नागनाथ मुंढे पोलीस शिपायावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिन्ही बाल आरोपीविरुद्ध डोंगरी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भांडणात मध्यस्थी केली म्हणून या मुलांकडून पोलीस शिपायावर हल्ला करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
अनिकेत मुंढे हे आग्रीपाड्यातील सातरस्ता, धोबीघाट परिसरात राहतात. सध्या ते ल विभागात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. त्यांची नेमणूक डोंगरीतील उमरखाडी बालसुधारगृहात आहे. मंगळवारी सकाळी पावणेबारा वाजता बालसुधारगृहातील काही मुलांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. हा प्रकार निदर्शनास येताच अनिकेत यांनी तिथे धाव घेऊन त्यांच्यातील भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला होता.
यावेळी एका बाल आरोपीने त्यांनाच शिवीगाळ केली तर दुसर्याने त्यांना जोरात मिठी मारुन पकडून ठेवले. तिसर्याने त्यांच्या छाव्या कानावर जोरात ठोसा लगावला होता. त्यात त्यांना दुखापत झाली होती. आमच्या भांडणात मध्यस्थी करतोस का, आता तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीच या तिघांनी त्यांना दिली होती. हा प्रकार नंतर इतर पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी अनिकेत यांची सुटका करुन तिन्ही मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
ही माहिती प्राप्त होताच डोंगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अनिकेत मुंढे यांची जबानी नोंदवून त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध कर्तव्य बजाविणार्या पोलीस शिपायाला शिवीगाळ करुन हुज्जत घालणे, मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत तिघांवर लवकरच कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.