मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ जानेवारी २०२४
मुंबई, – दुसर्या कारचा क्रमांक वापरुन एका व्यक्तीची फसवणुकीचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका ३८ वर्षांच्या आरोपीस कारचाकास कुलाबा पोलिसांनी अटक केली. प्रसाद चंद्रकांत कदम असे या चालकाचे नाव असून त्याच्याविरुद्ध फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाहतूक पोलिसांकडून आलेल्या चलनामुळे दोन कारमधील एकाच क्रमांकाचा पर्दाफाश करण्यात तक्रारदारांना यश आले आहे.
साकीरअली रोझअली हे ४७ वर्षांचे तक्रारदार नरिमन पॉईंट येथील फ्री प्रेस रोड, महात्मा फुले नगर परिसरात राहत असून त्यांच्या मालकीची एक पांढर्या रंगाची मारुती सुझुकी इस्टीगा कार आहे. साकीरअलीकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत नाही. तरीही त्यांना वाहतूक पोलिसांकडून दंड भरण्याबाबत चलन आले होते. एक-दोन चलन आल्यानंतर त्यांना संशय आला होता. त्यामुळे त्यांनी त्याची शहानिशा सुरु केली होती. यावेळी त्यांना ज्या ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लघंन झाले आहे, त्या ठिकाणी ते गेलेच नसल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या कारच्या क्रमांकाचा कोणीतरी दुरुपयोग करत असून त्याच्यामुळे त्यांना वाहतूक पोलिसाकडून चलन येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी या कारचा चालकाचा शोध सुरु केला होता.
सोमवारी अशाच प्रकारची एक पांढर्या रंगाची मारुती सुझुकी कार त्यांना गेटवेजवळ पार्क केल्याचे दिसून आले. या कारचा क्रमांक त्यांच्याच कारचा होता. त्यामुळे त्यांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती सांगून पोलीस मदतीची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीनंतर कुलाबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांनी कारचालक प्रसाद कदम याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच दंडात्मक कारवाईसाठी वाचण्यासाठी साकीरअली यांच्या कारच्या क्रमांकाचा दुरुपयोग केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याच्याविरुद्ध साकीरअलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच प्रसाद कदम याला पोलिसांनी अटक केली. प्रसाद हा नवी मुंबईतील सीवूड, करावे गावचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.