पेंडलरला एमडी ड्रग्ज पुरविणार्या मुख्य आरोपीस अटक
गुन्हा दाखल होताच गेल्या दिड वर्षांपासून फरार होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – पेंडलरला एमडी ड्रग्ज पुरविणार्या एका मुख्य आरोपीस एमएचबी पोलिसांनी अटक केली. भव्य किर्ती डागा ऊर्फ भावेश धोत्रे ऊर्फ भव्या जैन असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल होताच भव्या हा पळून गेला होता, अखेर दिड वर्षांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्या अटकेने एमडी ड्रग्ज सप्लायर करणार्या काही मुख्य आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
२८ मे २०२५ रोजी एमएचबी पोलीस ठाण्याचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. दहिसर येथील कांदरपाडा, प्रमिलानगर ब्रिजखाली, फायर बिग्रेडजवळ गस्त घालताना या पथकाने एका संशयास्पद फिरणार्या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्या अंगझडतीत पोलिसांनी ३० ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज जप्त केला होता. त्याची किंमत सुमारे अडीच लाख रुपये इतकी होती. या कारवाईदरम्यान तिचा एक सहकारी पळून गेला होता. तपासात महिलेचे नाव भाग्यश्री असल्याचे उघडकीस आले होते.
बी कॉमपर्यंत शिक्षण घेणारी भाग्यश्री ही दहिसर येथील हनुमान टेकडी, दुर्गा कंपाऊंड, पवार चाळीत राहत होती. चौकशीत पळून गेलेेला आरोपी शाबाद असल्याचे तिने सांगितले होते. तो दहिसर येथील अशोकवन परिसरातील एका गॅरेज दुकानात काम करत होता. ते दोघेही तिथे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आले होते, मात्र ते ड्रग्ज विक्री करण्यापूर्वीच तिला पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे या दोघांविरुद्ध पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. चौकशीत तिला ते एमडी ड्रग्ज भव्या जैन ऊर्फ भावेश धोत्रे याने दिल्याचे सांगितले.
तोच पेंडलरला एमडी ड्रग्ज पुरविण्याचे काम करत होता. त्यानंतर ते जास्त किंमतीत एमडी ड्रग्जची परिसरात विक्री करत होते. तपासात आलेल्या माहितीनंतर त्याला पोलिसांनी वॉण्टेड आरोपी दाखविले होते. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. मात्र प्रत्येक वेळेस तो पोलिसांना गुंगारा देत होता. तरीही पोलिसांनी त्याचा शोध सुरु ठेवला होता.
ही शोधमोहीम सुरु असतानाच दोन दिवसांपूर्वी त्याला दहिसर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने भाग्यश्रीसह इतरांना एमडी ड्रग्ज पुरविल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या संपर्कात काही मुख्य ड्रग्ज तस्कर असल्याने त्यांच्याविषयी जास्तीत जास्त माहिती काढण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.