दहा वर्षांपूर्वी केलेल्या तक्रारीच्या वादातून सुरक्षारक्षकावर चाकूने हल्ला

हल्ल्यानंतर पळून गेलेल्या सराईत आरोपीस अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – दहा वर्षांपूर्वी अंधेरी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर झालेल्या अटकेच्या वादातून एका ५४ वर्षांच्या सुरक्षारक्षकाची त्याच्याच परिचित आरोपीने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना अंधैरी परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात प्रविण गोविंद मकवाना याच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याने त्याला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी आरोपी शैलेश दिपक मेहता ऊर्फ चिकूडा याच्याविरुद्ध अंधेरी पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. शैलेश हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध दहा वर्षापूर्वीचे वीसहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना शनिवारी १७ ऑक्टोंबरला सायंकाळी पावणेसात वाजता अंधेरीतील मोगरापाडा, पी डी तिवारी मार्ग, शिवशाही गणेश सेवा प्रतिष्ठानजवळ घडली. प्रविण मकवाना हा सुरक्षारक्षक असून त्याच्या कुटुंबियांसोबत जोगेश्‍वरीतील मनोज डेअरीजवळ राहतो. शनिवारी सायंकाळी प्रविण हा त्याच्या काही मित्रांसोबत अंधेरीतील शिवशाही गणेश सेवा प्रतिष्ठानजवळ गप्पा मारत होता. याच दरम्यान तिथे शैलेश आला होता. काही कळण्यापूर्वीच त्याने प्रविणशी वाद घालून त्याच्यावर चाकूने वार केले होते. त्यात त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर शैलेश तेथून पळून गेला होता. रक्तबंबाळ झालेल्या प्रविणला त्याच्या मित्रांनी तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले होते.

ही माहिती प्राप्त होताच अंधेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी प्रविणची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तपासात शैलेश मेहता हा प्रविणच्या परिचित असून दहा वर्षीपूर्वी ते दोघेही एकाच परिसरात राहत होते. तिथेच वास्तव्यास असताना त्यांच्या बहिणीची शैलेशने छेड काढली होती. बहिणीकडून ही माहिती मिळताच त्यांनी शैलेशविरुद्ध अंधेरी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याच्यावर अटकेची कारवाई केली होती.

अटकेनंतर त्याला नंतर जामिन मंजूर झाला होता. बहिणीच्या छेडछाडीवरुन प्रविणने त्याची पोलिसांत तक्रार केल्याच्या त्याच्या मनात प्रचंड राग होता. मात्र त्यावेळेस त्याने त्याच्याशी वाद घातला नव्हता. दहा वर्षांनंतर त्याने जुन्या रागातून प्रविणवर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. हल्ल्यानंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला उशिरा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

शैलेश हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध वीसहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. पूर्वी तो अंधेरी परिसरात राहत होता. नंतर तो गुजरातला निघून गेला होता. काही वर्षांपासून तो भाईंदर परिसरात राहत होता. त्यानंतर तो अधूनमधून अंधेरीतील राहत्या घरी येत होता. दहा वर्षांपूर्वीच्या तक्रारीचा राग त्याच्या मनात होता. त्यातून त्याने हा हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंछर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page