पोट्रेक्शन मनीच्या नावाने खंडणीसाठी धमकी देणार्या टोळीचा पर्दाफाश
खंडणीच्या गुन्ह्यांत मुख्य आरोपी बंधूंसह बाराजणांना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जुलै २०२६
मुंबई, – पोट्रेक्शन मनीच्या नावाने २५ लाखांच्या खंडणीसाठी धमकी देणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत मुख्य आरोपी बंधूंसह बाराजणांना पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीन यासीन बेहलीम, जुल्फीकार यासिन बेहलीम, अजय रविंद्र यादव, अन्वर अहमद फारुखी, मोहम्मद आसिफ मोईनुद्दीन खान, मोहम्मद कलीम मोहम्मद रौफ सय्यद, रियाज सादिकअली शेख, आदिल नाजीर कुरेशी, रितेशकुमार फुलेंद्र राम, बिलाल अहमद सय्यद, नौशाद अहमद नासीर अहमद सलमानी आणि सिकंदर तन्वर अशी या बाराजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्व आरोपींना किल्ला कोर्टाने शुक्रवार ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील मोहसीन आणि जुल्फीकार हे दोघेही बंधू असून ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या दोघांनी स्वतची टोळी बनवून पश्चिम उपनगरातील अनेक व्यावसायिक, व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकी दिल्याचे बोलले जाते. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही खंडणीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यातील तक्रारदार घाटकोपर येथे राहत असून बिल्डर असून त्यांची स्वतची एक खाजगी कंपनी आहे. ही कंपनीत विविध कामाचे कॉन्ट्रक्ट घेते. विलेपार्ले येथील एका खाजगी कंपनीसोबत त्यांचा करार झाला आहे. या कंपनीला म्हाडाकडून विलेपार्ले येथे गटार आणि पायवाटा दुरुस्तीचे चार कोटीचे कंत्राट काम मिळाले होते. ऑगस्ट-सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित कामाची सुरुवात होणार होती. त्यांच्या कंपनीसह मोहम्मद सिंकदर तन्वर यानेही ही निविदा भरली होती, मात्र त्यांच्या कंपनीला म्हाडाचे संबंधित कंत्राट प्राप्त झाले होते. २० जुलैला त्यांना मोहम्मद सिंकदरने कॉल करुन वांद्रे येथे भेटण्यासासाठी बोलाविले होते. त्यामुळे ते त्याला भेटण्यासाठी गेले होते. यावेळी सिंकदरने त्यांना त्यांच्या कंपनीला विलेपार्ले येथे म्हाडाचे काम मिळाले आहे ते त्यांच्या कंपनीमार्फत करावे लागेल. त्यांनी तसे केले नाहीतर त्यांना २५ लाख रुपये द्यावे लागतील अशी धमकी दिली होती.
आपण सरकारी निविदा भरण्याचे काम मोहसीन आणि जुल्फीकार बेहलीमच्या सांगण्यावरुन करतो असे सांगितले.ते दोघेही मोठे गॅगस्टर असून त्यांना खंडणीची रक्कम दिली नाहीतर तुझा गेम करतील. त्यामुळे त्यांच्याशी दुश्मनी न करता त्यांना पोट्रेक्शन मनी म्हणून २५ लाख रुपये द्यावे लागेल. त्यानंतर सिंकदर त्यांना सतत खंडणीसाठी धमकी देत होता. सततच्या येणार्या धमकीनंतर त्यांनी प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. या घटनेनंतर त्यांच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध घातक शस्त्रांचा धाकावर पोट्रेक्शन मनीच्या नावाने खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. २६ जुलैला सिंकदरने त्यांना कॉल करुन खंडणीची रक्कम घेऊन वांद्रे येथील ताज ऍण्ड लॅण्ड एंड हॉटेलजवळ बोलाविले होते.
या माहिती तक्रारदाराकडून प्राप्त होताच पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक् महेंद्र पाटील, जयदीप जाधव, मोहन जगदाळे, विजय धोत्रे, श्रीराम घोडके, पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील, ऋषिकेश बाबर, सुजीत म्हैसधुणे, सहाय्यक फौजदार म्हाळसंक, भोसले, वैद्य, गवळी, पोलीस हवालदार परब, राहुल पवार, भिंगारदेवे, पोलीस शिपाई पाटील, सोनावणे, कदम, बच्छाव, महिला पोलीस हवालदार गडहिरे आदी पथकाने ताज हॉटेलजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती.
ठरल्याप्रमाणे तिथे खंडणीची रक्कम घेण्यासाठी अजय यादव व इतर अकराजण आले होते. त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता या पथकाने घटनास्थळाहून मोहसीन, जुल्फीकारसह इतर दहाजणांना शिताफीने ताब्यात घेतले. सर्व आरोपी गुंड प्रवृत्तीचे सराईत गुन्हेगार आहेत. यातील मोहसीन आणि जुल्फीकार हे दोघेही सख्खे बंधू असून त्यांनीच स्वतची एक टोळी बनविली होती. इतर सहकार्यांच्या मदतीने त्यांनी तक्रारदार कॉन्ट्रक्टला खंडणीसाठी धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत ते जामिनावर बाहेर आले होते.
जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी पश्चिम उपनगरातील काही व्यावसायिकांना खंडणीसाठी टार्गेट करण्यास सुरुवात केली होती. त्यात तक्रारदार बिल्डरचा समावेश होता. दुसरीकडे अन्य आरोपीमध्ये अजय हा सांताक्रुज येथे राहत असून तो सध्या सीएची प्रॅक्ट्रीस करतो. बिलाल, मोहम्मद आसिफ, अन्वर हा चालक, आदिल कॉन्ट्रक्टर तर नौशाद हा हॅण्डवर्कचे काम करतो. इतर आरोपी काहीच कामधंदा करत नसून मोहसीन आणि जुल्फीकारच्या आदेशावरुन काम करतात. या आरोपींकडून पोलिसांनी बारा मोबाईल, बारा सिमकार्ड जप्त केले आहेत.
खंडणीच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने मुंबईसह इतर शहरात अशाच प्रकारे काही व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकी दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून खंडणीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.