ज्वेलर्स व्यापार्‍याला खंडणीसाठी धमकाविणार्‍या चौघांना अटक

खंडणीसाठी लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने केला होता कॉल-मॅसेज

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 फेब्रुवारी 2026
मुंबई, – बोरिवलीतील एका नामांकित ज्वेलर्स व्यापार्‍याला 30 लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी देणार्‍या टोळीचा बोरिवली पोलिसांनी अवघ्या 48 तासांत पर्दाफाश केला. याप्रकरणी झारखंडचे रहिवाशी असलेल्या चार आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. रियाजउद्दीन मोहम्मद बशीर, मोहम्मद फैय्याज मोहम्मद कय्युम मंसुरी ऊर्फ सद्दाम, मोहम्मद आश्रफुल कादरी मोहम्मद हासिम अन्सारी आणि मोहम्मद आरबाज अन्सारी मोहम्मद इजहार अन्सारी अशी या चौघांची नावे असून खंडणीच्या याच गुन्ह्यांत या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने सोमवार 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौघांनी ज्वेलर्स व्यापार्‍याला लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने कॉल तसेच मॅसेज केल्याचे तपासात उघडकीस आले. या टोळीशी त्यांचा संबंध आहे का नाही याचा तपास सुरु आहे. मात्र झटपट पैशांसाठी त्यांनी ही धमकी दिल्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद निंबाळकर यांनी सांगितले.

यातील तक्रारदार जोगेश्वरी येथे राहत असून बोरिवलीतील एका ज्वेलर्स शॉपमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. बुधवारी 18 फेब्रुवारीला शॉपच्या मोबाईल क्रमांकावरुन एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन एक मॅसेज आला होता. त्यात लॉरेन्स बिष्णोईच्या नावाचा वापर करुन अज्ञात व्यक्तीने ज्वेलर्स व्यापार्‍याकडे तीस लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणीची रक्कम दिली नाहीतर बाबा सिद्धीकीप्रमाणे तुमची हत्या घडवून आणू. त्यामुळे 24 तासांत खंडणीची रक्कम दिली नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली होती. या प्रकारानंतर त्यांनी ज्वेलर्स मालकांना ही माहिती दिली.

दुसर्‍या दिवशी सकाळी सव्वाअकरा वाजता याच मोबाईलवर पुन्हा अज्ञात व्यक्तीने व्हॉटअप कॉल करुन खंडणीची मागणी केली होती. तुम्ही अजूनही पैशांची व्यवस्था केली नाही. तुमचाही बाबा सिद्धीकी करावा लागेल असे सांगून संबंधित रेकॉडिंग कोणालाही पाठवायचे असेल तर पाठवा. तुम्हाला बोरिवलीत कोणीही वाचवू शकणार नाही असे सांगून फोन कट केला. त्यानंतर त्याच व्यक्तीने तुम्हाला लवकरच गोळ्या घालणार, वाट पहा असा मॅसेज पाठविला होता. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र सलग दोन दिवस लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने खंडणीसाठी धमकी आल्यानंतर ज्वेलर्स मालक प्रचंड घाबरले होते.

21 फेब्रुवारीला ज्वेलर्स मालक त्यांच्या दुकानात आले होते. यावेळी त्यांना पुन्हा अज्ञात व्यक्तीने कॉल करुन खंडणीसाठी धमकी दिली होती. यावेळी त्यांनी त्यांना एक लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. यावेळी त्याने दहा लाखांची मागणी करुन पैसे दिले नाहीतर गोळी खाण्यासाठ तयार रहा असे सांगितले. त्यांनी दहा लाख रुपये देणे शक्य नसल्याने त्याला चार लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. त्याने त्यांना एक लाख रुपये जीपे तर उर्वरित रक्कम बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगितले. यावेळी त्यांनी त्याला बँक खात्यात पैसे पाठविण्याची व्यवस्था करतो असे सांगितले. या घटनेनंतर त्यांनी बोरिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता.

त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिली होती. विलेपार्ले येथे अशाच एका ज्वेलर्स व्यापार्‍याला लॉरेन्स बिष्णोईकडून धमकी आली होती. त्यांनतर बोरिवली आणि अंधेरीतील व्यापार्‍यांना अशाच प्रकारे धमकी आल्याने त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत बोरिवली पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुसुदन नाईक, पोलीस निरीक्षक मिलिंद नागपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील, प्रमोद निंबाळकर, राजेश कदम, पोलीस हवालदार रमेश गायकवाड, पोलीस शिपाई सच्चिदानंद रेवाळे, महेश पाटील, कदम यांनी रियाजुद्दीनला ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी वांद्रे आणि जोगेश्वरीतून मोहम्मद फैय्याज, मोहम्मद आश्रफुल आणि मोहम्मद आरबाज या तिघांना अटक केली. चौकशीत ते चौघेही झारखंडच्या धनबादचे रविहाशी त्यांनी खंडणीसाठी धमकी दिल्याची कबुली दिली आहे. गेल्याच आठवड्यात ते झारखंड येथून मुंबईत आले होते. खंडणीची मिळेल ती रक्कम घेतल्यानंतर ते चौघेही झारखंडला पळून जाणार होते.

मात्र त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांनी अशाच प्रकारे इतर काही व्यापारी, व्यावसायिकांना धमकी दिली होती का याचा पोलीस तपास करत आहे. झारखंडमध्ये सायबर गुन्ह्यांतील अनेक टोळ्या कार्यरत असून अटक आरोपी याच टोळीशी संबंधित आहेत. सायबर गुन्ह्यानंतर त्यांनी आता लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने दहशत निर्माण करुन खंडणीसाठी धमकी देण्याची मालिका सुरु केली का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page