२६ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी म्हाडाच्या तोतया अधिकार्याला अटक
मिरारोडच्या म्हाडा कॉलनीत दोन फ्लॅटच्य आमिषाने व्यावसायिकाला गंडा
अरुण सावरटकर
१८ जुलै २०२६
मुंबई, – सुमारे २६ लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका तोतया म्हाडा अधिकार्याला दिडोंशी पोलिसांनी अटक केली. सुजीत दत्ताराम चव्हाण असे या तोतयाचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. अफजल बाबूभाई फाटक हा या कटातील दुसरा आरोपी असून त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. या दोघांनी एका व्यावसायिकाला मिरारोडच्या म्हाडा कॉलनी, शांतीनगर इमारतीमध्ये म्हाडाचे दोन फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून २६ लाखांना गंडा घातल्याचा आरोप आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतरांची फसवणुक केल्याचे बोलले जात आहे.
मनिष ओमप्रकाश अग्रवाल हे ५१ वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत गोरेगाव येथील बेस्टनगरात राहतात. गोरेगाव परिसरात त्यांची एक खाजगी कंपनी असून या कंपनीमार्फत ते विविध ग्राहकांना विमा पॉलिसीसह वाहन तारण कर्ज देण्याचे काम करतात. जुलै २०२३ साली त्यांची अफजल फाटकशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने त्याचा म्हाडा कार्यालयात एक अधिकारी परिचित असून तो म्हाडा लॉटरीमध्ये फ्लॅट मिळवून देण्याचे काम करतो. मिरारोड येथे म्हाडातर्फे काही इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याची लॉटरी प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. याच ठिकाणी त्यांना स्वस्तातात म्हाडाचा फ्लॅट देतो असे सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला त्यांची वैयक्तिक माहिती दिली होती.
काही दिवसांनी त्याने त्यांची ओळख सुजीत चव्हाणशी करुन दिली. सुजीत हा कांदिवलीतील महावीरनगर परिसरात राहत असून म्हाडामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतो असे सांगून त्याचे ओळखपत्र दाखवून त्यांनी त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी सुजीतने त्यांना मिरारोडच्या न्यू स्काय लाईन, म्हाडा कॉलनी, शांतीनगर परिसरात म्हाडाच्या काही इमारती आहेत. तिथेच त्यांना ८० लाखांचा ७५० चौ. फुटाचा फ्लॅट ५५ लाखांमध्ये देण्याचे आश्वासन दिले होते. सुरुवातीला त्यांना विश्वासच बसला नाही, मात्र सुजीतने त्यांना काही दिवसांत त्यांना फ्लॅटचे अलोटमेंट देण्याचे आश्वासन देत सर्व काही सेंटींग होत असल्याचे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांच्याकडे दोन फ्लॅटसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. त्यांनीही त्यांना दोन फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांनी त्यांना फ्लॅटसाठी प्रत्येकी तेरा लाख रुपये देण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी दोन फ्लॅटसाठी त्यांना टप्याटप्याने २६ लाख रुपये दिले होते. या पेमेंटनंतर त्यांच्यात फ्लॅटबाबत एक करार झाला होता. त्यात त्यांना म्हाडा कॉलनीतील शांतीनगर इमारतीमध्ये फ्लॅट क्रमांक ए/१९०६ आणि ए २००६ देण्याचे नमूद करण्यात आले होते.
फ्लॅटचा ताबा मिळाल्यानंतर उर्वरित पैसे म्हाडा कार्यालयात जमा करावे लागेल असे करारात स्पष्ट करण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटचे कागदपत्रे दिले नव्हते. विचारणा केल्यानंतर ते दोघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. तीन वर्ष उलटूनही त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी त्यांना पैसे दिले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दिडोंशी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सुजीत चव्हाण आणि अफजल फाटक या दोघांविरुद्ध पोलिसांनी म्हाडाचे दोन फ्लॅट देण्याचे आमिष दाखून फ्लॅटसाठी घेतलेल्या २६ लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. त्यांचा शोध सुरु असताना गेल्या दिड महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या म्हाडाच्या तोतया अधिकारी सुजीत चव्हाण याला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत अफजल फाटक याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या दुकलीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.