मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ जानेवारी २०२४
मुंबई, – बोगस भारतीय पासपोर्टवर विदेशात प्रवास केल्याप्रकरणी दोन प्रवाशांना छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्यांनी ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यात एका बांगलादेशी आणि नेपाळी नागरिकाचा समावेश आहे. शरीफ मोहम्मद मोफिजुर रेहमान तिलक बाधी ऊर्फ तिलक काळे सोनी अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांनाही बोगस आधारकार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्ट कोणी मिळवून दिले याचा पोलीस तपास करत आहेत.
शुभंम प्रभाकर कांत हे अंधेरीतील गुंदवली परिसरात राहत असून सध्या एसआयबीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहाय्यक इमिग्रेशन अधिकारी म्हणून काम करतात. शनिवारी रात्री आठ वाजता ते नेहमीप्रमाणे काऊंटर २२ वरील कामावर हजर झाल होते. त्यांच्यावर विदेशात जाणार्या प्रवाशांचे इमिग्रेशन तपासणीचे काम होते. शनिवारी रात्री उशिरा दोन वाजता तिथे शरीफ रेहमान हा आला होता. त्याच्या कागदपत्रांची पाहणी करताना तो मॉरीशस येथून मुंबईत आला होता. त्याच्या पासपोर्टवर मार्च २०२३ रोजी तो बांगलादेशात गेल्याची नोंद होती. याबाबत त्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने तो बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगितले.
सात वर्षांपूर्वी तो बांगलादेशातून भारतात पळून आला होता. तेव्हापासून तो गुजरातच्या सुरत शहरात वास्तव्यास होता. याच दरम्यान त्याने सुरत शहरातून बोगस आधारकार्ड, पॅनकार्डसह इतर बोगस भारतीय दस्तावेज बनविले होते. या दस्तावेजाच्या मदतीने त्याने मार्च २०१७ रोजी भारतीय पासपोर्ट मिळविले होते. त्याच्या मोबाईलची पाहणी केल्यात त्याचे बांगलादेशी नागरिक, बांगलादेशी पासपोर्टचे फोटो मिळून आले. १० नोव्हेंबर २०२४ रोजी याच बोगस भारतीय पासपोर्टवर तो मॉरीशसला गेला होता. तेथून तो ४ जानेवारी रात्री उशिरा मुंबईत आला होता. याच पासपोर्टवर तो दोन वेळा बांगलादेशात गेला होता. तपासात ही माहिती उघडकीस येताच त्याला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याप्रकरणी शुभंम कांत यांच्या तक्रारीवरुन शरीफ रेहमानविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन पासपोर्ट मिळवून विदेशात प्रवास केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
दुसर्या कारवाईत तिलक बाधी या ३३ वर्षांच्या नेपाळी नागरिकाला सहार पोलिसांनी अटक केली. रविवारी सकाळी सव्वापाच वाजता तिलक हा छत्रपती शिवाजी महााज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. तो विमानाने काठंमाडू येथे जाणार होता. आयडी प्रुफ म्हणून त्याने आधारकार्ड आणि पॅनकार्ड दाखविले होते. मात्र त्याच्या पासपोर्टमधील नाव आणि जन्मतारीखेत तफावत होती. चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने नेपाळी नागरिक असल्याचे सांगितले. गेल्या चौदा वर्षांपासून तो गुजरातच्या सुरत शहरातील विविध हॉटेलमध्ये काम करत होता. याच दरम्यान त्याने बोगस भारतीय दस्तावेज बनवून पासपोर्टसाठी अर्ज केला होता. बोगस भारतीय पासपोर्ट मिळाल्यानंतर तो काही महिने सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून पासपोर्ट मिळवून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.