भारतीय सैन्यातून निवृत्त झालेल्या वयोवृद्धाची फसवणुक
कांदिवलीतील घटना; तीन ठगाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ ऑगस्ट २०२४
मुंबई, – भारतीय सैन्यातून निवृत्त झालेल्या एका ५८ वर्षांच्या तीन ठगांनी सुमारे ३४ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार कांदिवलीतील चारकोप परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिन्ही ठगाविरुद्ध चारकोप पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. शशिकांत कदम, यासीन शेख आणि संतोष कदम अशी या तिघांची नावे असून यातील शशिकांत आणि संतोष हे दोघेही बंधू आहेत तर यासीन हा शशिकांतच्या साई रियल इस्टेटचा सहकारी आहे. या तिघांनी म्हाडाच्या फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन तक्रारदारांची फसवणुक केल्याचा आरोप आहे.
राजेशकुमार सोनेलाल राठोड हे कांदिवलीतील चारकोप, भाबरेकरनगरात राहत असून ते भारतीय सैन्यातून निवृत्त झाले आहेत. पूर्वी ते मालाडच्या जनकल्याणनगरात राहत होते. या ठिकाणी शशिकांत कदम राहत असून तो त्यांच्या परिचित होता. त्याचा साई रियल इस्टेटचा व्यवसाय होता. जुलै २०१८ साली त्यांना फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती, त्यामुळे ते नवीन फ्लॅटचा शोध घेत होते. याच दरम्यान त्यांची शशिकांतशी भेट झाली होती. त्याने त्यांना त्यांच्याच जनकल्याणनगर, सप्तर्षी टॉवरच्या इमारत क्रमांक ५५, डी विंग, १५०१ क्रमांकाचा फ्लॅट स्वस्तात देण्याचे आश्वासन दिले होते. हा फ्लॅट रिकामा असून फ्लॅटमालकाला फ्लॅटची विक्री करायची आहे. त्याच दिवशी त्याने त्यांना फ्लॅट दाखविला. त्यांना फ्लॅट आवडल्याने त्यांनी तोच फ्लॅट घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर त्यांच्यात फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार ३९ लाख ५० हजारामध्ये झाला होता. ठरल्याप्रमाणे जुलै २०१८ ते मे २०१९ या कालावधीत त्यांनी शशिकांत, त्यांचा भाऊ संतोष कदम आणि कार्यालयातील सहकारी यासीन शेख यांच्या बँक खात्यात कॅश आणि धनादेशाद्वारे ३९ लाख ३१ हजार ७५० रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम मिळाल्यानंतर त्यांनी त्यांना म्हाडा कार्यालयातून फ्लॅट अलोट झाल्याचे तसेच ताबा पत्र दिले होते.
मात्र वारंवार विचारणा करुनही त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. त्यामुळे त्यांनी फ्लॅटचा ताबा दे नाहीतर फ्लॅटसाठी घेतलेले पैसे परत करण्यासाठी त्यांच्याकडे तगादा लावला होता. त्यानंतर त्यांनी त्यांना पाच लाखांचे तीन धनादेश दिले होते, त्यापैकी दोन धनादेश न वटता परत आले तर पाच लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले होते. मात्र उर्वरित सुमारे ३४ लाखांचा या तिघांनी परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. या तिघांकडून पैसे मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी शशिकांत कदम, संतोष कदम आणि यासीन शेख या तिघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून पळून गेलेल्या तिन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.