चार महिन्यांच्या मुलीची पित्याकडून गळा आवळून हत्या
वाढत्या महागाईत पालनपोषण करणे शक्य नसल्याने मुलीला संपविले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 मार्च 2025
मुंबई, – चार महिन्यांच्या मुलीची तिच्याच पित्याने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. श्रेया संजय कोकरे असे हत्या झालेल्या मुलीचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी तिचे पिता संजय बाबू कोकरे याला पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे. संजयला आधीच दोन मुले आहे, त्यात चार महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीची प्रसुती होऊन तिने एका मुलीला जन्म दिला होता. वाढत्या महागाईत मुलांचा पालनपोषण करणे शक्य नसल्याने त्याने मुलीला संपविल्याचे बोलले जाते.
ही घटना शुक्रवारी 28 फेब्रुवारीला सकाळी पावणेदहा वाजता घाटकोपर येथील कामराज नगर, भैरव विद्यालयसमोरील गल्ली, गल्ली क्रमांक दहामध्ये घडली. याच ठिकाणी शैला संजय कोकरे ही 36 वर्षांची महिला तिच्या पती आणि दोन मुलांसोबत राहते. संजय हा तिचा पती असून तो बिगारी कामगार आहे. त्याला आधीच दोन मुले होती. त्यात तिच्या पत्नीने चार महिन्यांपूर्वी एका मुलीला जन्म दिला होता. वाढत्या महागाईत मुलाचे पालनपोषण करणे अवघड जास्त असल्याने त्याला तिसरे मुल नको होते. तरीही त्याच्या पत्नीने तिसर्या मुलासाठी प्रयत्न सुरु ठेवले होते. त्याचा त्याला राग होता.
शुक्रवारी सकाळी त्याची पत्नी शैला ही नेहमीप्रमाणे घरकामासाठी गेली होती. त्यापूर्वी तिने श्रेयाला झोपविले होते. तिला पाळण्यात ठेवून ती घरातून निघून गेली होती. यावेळी तिथे संजय आला आणि त्याने श्रेया हिची झोपेतच गळा आवळून हत्या केली होती. हा प्रकार नंतर शैलाला समजताच तिने तिला तातडीने जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. श्रेयाचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल शनिवारी पोलिसांना प्राप्त झाला होता. या अहवालात श्रेया हिचा गळा आवळण्यात आल्याचे उघडकीस आले होते. या घटनेनंतर संजयला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच त्याच्याच चार महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर शैला कोकरे हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पिता संजय कोकरे याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. जन्मदात्या पित्याने चार महिन्यांच्या चिमुकल्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.