मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 मार्च 2025
मुंबई, – मुलाला कायमस्वस्पी शासकीय नोकरीच्या आमिषाने एका व्यक्तीची त्याच्या परिचित आरोपीने सुमारे तीस लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार वडाळा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुंदरमकुमार चक्रवर्ती दुबे या 28 वर्षांच्या आरोपीविरुद्ध वडाळा पोलिसांनी फसवुणकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत चौकशीसाठी त्याला पोलिसांकडून समन्स बजाविले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सुंदरमकुमारने शासकीय नोकरीच्या आमिषाने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. 47 वर्षांचे प्रमोदकुमार शिवजोर गुप्ता यांचा कपड्याचा व्यवसाय आहे. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत वडाळा येथील कोरबा मिठागर, नाना भाईवाडी परिसरात राहतात. गेल्या वर्षी जुलै महिन्यांत त्यांची सुंदरमकुमारशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. याच दरम्यान त्याने त्यांच्या मुलाला शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याने अनेकांना शासकीय नोकरी मिळवून दिली आहे असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांच्या मुलाला शासकीय नोकरी मिळवून देण्याची विनंती केली होती.
याच नोकरीसाठी त्यांनी त्याला जुले ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत 30 लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते. हा संपूर्ण व्यवहार त्यांच्या राहत्या घरी झाला होता. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांच्या मुलाला नोकरी दिली नाही. विचारणा केल्यानंतर तो विविध कारण सांगून त्यांना प्रतिसाद देत नव्हता. त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. शासकीय नोकरीच्या आमिषाने सुंदरमकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याच्याविरुद्ध वडाळा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सुंदरमकुमार दुबे याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.