मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मार्च 2025
मुंबई, – आजीला भेटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका अल्पवयीन मुलीवर पाचजणांच्या टोळीने सामूहिक लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अपहरणासह सामूहिक लैगिंक अत्याचार तसेच पोक्सोचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या पाचही आरोपी तरुणांना जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर या सर्वांना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले आहे. पिडीत मुलीची मेडीकल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पिडीत मुलगी ही जोगेश्वरी येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहते. फेब्रुवारी महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात ती तिच्या आजीला भेटण्यासाठी घरातून बाहेर पडली. मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी आली नाही. तिचा कुठलाही संपर्क झाला नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, आजीकडे विचारणा केल्यानंतर ती तिथे आली नसल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे तिच्या पालकांनी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांच्या मुलीची मिसिंगची तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या मुलीचा शोध सुरु असताना तीन दिवसांनी ती दादर रेल्वे स्थानक परिसरात सापडली. तिला रेल्वे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
तिच्या चौकशीनंतर तिच्यावर पाचजणांच्या टोळीने सामूहिक लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली होती. तिच्या अपहरणाची जोगेश्वरी पोलीस ठाण्यात नोंद असल्याने ही माहिती नंतर स्थानिक पोलिसांना देण्यात आली होती. तिला नंतर मेडीकलसाठी जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच तिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. आजीला भेटण्यासाठी जात असताना तिचे पाचजणांनी अपहरण करुन तिच्यावर आळीपाळीने सामूहिक लैगिंक अत्याचार केला होता.
या जबानीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणासह सामूहिक लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना या पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या सर्वांना पोलीस बंदोबस्तात अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.