डिपोर्ट कारवाईपूर्वीच बांगलादेशी महिलेला तिच्या पतीने पळवून नेले
कुर्ला पोलीस वसाहतीतील घटनेने पोलीस दलात खळबळ
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 एप्रिल 2026
मुंबई, – बांगलादेशात डिपोर्ट करण्यापूर्वी कुर्ला येथील पोलीस वसाहतीत सुरक्षित ठेवण्यात आलेल्या एका बांगलादेशी महिलेने कायदेशीर रखवलीतून पलान केल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेला तिच्या पतीनेच पळून नेल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे या दोघांविरुद्ध कुर्ला पोलिसांनी कायदेशीर रखवालीतून पळून जाणे तसेच आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिरजानबेगम इस्माईल शेख ऊर्फ नसरीन आणि मनिष बलदेव राजभर ऊर्फ इस्माईल शेख अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
मंदा यशवंत जगताप या पोलीस हवालदार असून सध्या त्या कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांची मुंबई शहरात वास्तव्यास तसेच कारवाईदरम्यान अटकेत असलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या गार्डसाठी नेमणूक केली. कुर्ला पोलीस वसाहतीमधील रिकाम्या असलेल्या अधिकारी कॉर्टरमध्ये पाच महिला आणि तीन मुले अशा आठजणांना ठेवण्यात आले होते. त्यांना तेथून त्यांच्या देशात पाठविण्यात येणार होते. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्यासह महिला अंमलदार गौरी सोनावणे यांची नेमणूक करण्यात आली होती.
गुुरुवारी पहाटे चार वाजता मिरजानबेगम ही बाथरुममध्ये जाते असे सांगून गेली. मात्र नंतर ती रुममध्ये कुठेच दिसून आली नाही. त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. ती पळून गेल्याची खात्री होताच त्यांनी कुर्ला पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर पोलीस निरीक्षक उर्किडे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण, सहाय्यक फौजदार फारुकी यांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. त्यात मिरजानबेगम ही पोलीस कंपाऊंडच्य बाहेर चिकणे चौकातून पळून जाताना दिसून आली.
भाभा हॉस्पिटल येथून ती बाहेर येताना तिचा पती मनिष राजभर ऊर्फ इस्माईल शेख याच्यासोबत पळून गेली होती. हा प्रकार उघडकीस येताच मिरजानबेगम शेख आणि तिचा पती मनिष राजभर या दोघांविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर रखवालीतून पळून जाणे तसेच पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत कुर्ला पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला दोन्ही आरोपींच्या अटकेचे आदेश दिले आहे. त्यामुळे या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या मिरा-भाईंदर येथील राहत्या घरी पोलिसांचे एक पथक पाठविण्यात आले होते.