त्या वयोवृद्ध महिलेने आत्महत्या केल्याचे उघड

कुर्ल्यातील नाल्यात मृतदेह सापडला होता

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ जुलै २०२४
मुंबई, – दोन दिवसांपूर्वी कुर्ला येथील नाल्यात सापडलेल्या वयोवृद्ध महिलेची ओळख पटविण्यात नेहरुनगर पोलिसांना यश आले आहे. या महिलेचे नाव रेणूबाई विष्णू जाधव (७०) असून तिने आजारामुळे आलेल्या मानसिक नैराश्यातून आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दोन दिवसांपूर्वीच तिने नेहरुनगर, शिवसृष्टी स्वामी विवेकानंद शाळेसमोरील नाल्यात उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिच्या कुटुंबियांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रार केली नाही. त्यामुळे नेहरुनगर पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

दोन दिवसांपूर्वी कुर्ला येथील नेहरुनगर, शिवसृष्टी स्वामी विवेकानंद शाळेसमोरील नाल्यात पोलिसांना एका वयोवृद्ध महिलेचा मृतदेह सापडला होता. हा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. मृत महिलेची ओळख पटली नव्हती, तिची ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू तिच्याकडे सापडली नाही. त्यामुळे तिची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु होते. या प्रयत्नात असताना रविवारी रात्री उशिरा पोलिसांना चेंबूर येथे राहणारी एक वयोवृद्ध महिला मिसिंग असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यामुळे तिच्या कुटुंबियांसह नातेवाईकांना मृत महिलेचा मृतदेह दाखविण्यात आले होते. यावेळी तो मृतदेह रेणूबाई जाधव हिचा असल्याचे उघडकीस आले. रेणूबाई ही चेंबूरच्या सिद्धार्थ नगर परिसरात तिच्या पती आणि चार मुलांसोबत राहत होती. तिला मधुमेहासह चार विविध आजार होते. या आजारावर तिच्यावर औषधोपचार सुरु होते. अलीकडेच तिच्यावर पाईल्स या आजारावर ऑपरेशन झाले होते. या आजारामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. त्यातच गेल्या वर्षी तिच्या पतीचे निधन झाले होते. त्यापूर्वी तिच्या दोन मुलांचे निधन झाले होते. त्यामुळे तिला नैराश्य आले होते. त्यातून तिने स्वतला संपविण्याचा निर्णय घेतला होता.

दोन दिवसांपूर्वी ती चेंबूर येथील कुर्ला परिसरात आली होती. यावेळी तिने नाल्यात उडी घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या कुटुंबियांसह नातेवाईकांच्या चौकशीतून हा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे त्यांची जबानी नोंदवून पोलिसांनी एडीआरची नोंद केली होती. त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रार केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पती आणि दोन मुलांच्या निधनानंतर तसेच औषधोपचारातून आजारावर काहीच परिणाम होत नसल्यानेच तिने तिचे जीवन संपविल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page