मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 एप्रिल 2026
मुंबई, – मोबाईल चोरीच्या संशयावरुन झालेल्या वादातून मोहम्मद जयाबुल शाह ऊर्फ अनिल या सहकार्याची त्याच्याच मित्राने बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना माहीम परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी मित्र निलेशकुमार सिताराम सिंह याला माहीम पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शंकर तेली ताडासम हे भोईवाडा पोलीस वसाहतीत राहत असून सध्या माहीम पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. रविवारी ते दिवसपाळीवर हजर झाले होते. सकाळी नऊ वाजता त्यांना रुपेश तांडेल नावाच्या एका व्यक्तीने कॉल केला होता. माहीम कॉजवे, अरुणकुमार वैद्य मार्ग, उत्तर वाहिनीवरील सार्वजनिक बाथरुमजवळ एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडला असल्याची माहिती त्याने दिली होती. या माहितीनंतर माहीम पोलिसांचे एक पथक तिथे रवाना झाले होते. घटनास्थळी पोलिसांना एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टांनी मृत घोषित केले.
चौकशीअंती मोईनुद्दीन शरीफ अन्सारी या व्यक्तीने मृत व्यक्तीचे नाव मोहम्मद जयाबुल असल्याचे सांगितले. त्याचा निलेशकुमार हा परिचित असून त्याच्यासोबत त्याचे मोबाईल चोरीवरुन वाद झाला होता. निलेशकुमारला मोहम्मद जयाबुनने त्याचा मोबाईल चोरी केल्याचा संशय होता. याच कारणावरुन त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यातून त्याने त्याला लाकडी बांबूने बेदम मारहाण केली होती. त्यात त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. मारहाणीत मोहम्मद जयाबुल हा बेशुद्ध झाला होता. या घटनेनंतर निलेशकुमार सिंह हा तेथून पळून गेला होता.
तपासात आलेल्या माहितीनंतर पोलिसांनी निलेशकुमारविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच निलेशकुमारला माहीम येथून पोलिसांनी अटक केली. चौकशीत मोहम्मद जयाबुल आणि निलेशकुमार हे दोघेही एकाच ठिकाणी राहत असून कॅटरिंगचे काम करतात. निलेशकुमारला मोहम्मद जयाबुलने त्याचा मोबाईल केल्याचा संशय होता. याच संशयावरुन त्यांच्यात वाद झाला आणि त्याने त्याची बेदम मारहाण करुन हत्या केल्याची कबुली दिली.
या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला 2 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले.