मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 जानेवारी 2026
मुंबई, – विलेपार्ले येथील एन. एम कॉलेजमधील प्रोफेसर आलोककुमार सिंग यांच्या हत्येनंतर पळून गेलेल्या मारेकर्याला काही तासांत मालाड येथून बोरिवली रेल्वे पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. ओमकार एकनाथ शिंदे असे या मारेकर्याचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. रागाच्या भरात आलोककुमार यांची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याची आरोपीने कबुली दिली आहे.
आलोककुमार हे मालाड पूर्वेला राहत असून एन. एम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत होते. शनिवारी सायंकाळी त्यांनी अंधेरी रेल्वे स्थानकातून बोरिवलीकडे जाणारी लोकल पकडली होती. लोकलमध्ये गर्दी असल्याने ते गॅगवेत उभे राहून प्रवास करत होते. ही लोकल सायंकाळी पावणेसहा वाजता मालाड रेल्वे स्थानकात आली होती, यावेळी लोकलमधून उतरताना त्यांच्या मागे असलेल्या ओमकारने त्यांना धक्का मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या पुढे एक महिला असल्याने त्यांनी ओमकारला धक्का मारु नकोस असे सांगितले होते. तरीही तो त्यांना धक्का देत होता. याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला आणि त्याचे पर्यावसान भांडणात झाले होते.
यावेळी त्यांच्यात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीनंतर ओमकारने त्याच्याकडील तिक्ष्ण हत्याराने आलोककुमार यांच्यावर वार केले होते. त्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या आलोककुमार यांना शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच बोरिवली रेल्वे पोलिसांनी पळून गेलेल्या मारेकर्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षत दत्ता खुपरेकर यांच्या पथकाने ओमकार शिंदे याला मालाड येथून पोलिसांनी अटक केली.
चोकशीत ओमकार हा मालाड येथील कुरार व्हिलेज परिसरात राहतो. तो दागिने पॉलिश करण्याचे काम करत होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आलोककुमार यांच्या हत्येनंतर तो त्याच्या घरी गेला होता, मात्र सीसीटिव्ही फुटेजमध्ये त्याची ओळख पटल्याने त्याला काही तासांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता खुपरेकर यांनी सांगितले.
गुन्ह्यांतील हत्यार अद्याप जप्त करण्यात आले नसून ते लवकरच हस्तगत केले आहेत. त्याने स्वतजवळ ते हत्यार बाळगण्याचे कारण काय होते याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. शनिवारी आलोककुमार यांच्या पत्नीचा वाढदिवस होता, त्यामुळे ते लवकरच घरी जाण्यासाठी निघाले होते. ते पत्नीसोबत बाहेर जेवणासाठी जाणार होते. मात्र सायंकाळी मालाड रेल्वे स्थानकात झालेल्या क्षुल्लक वादातून आलोककुमार यांची हत्येची माहिती मिळताच सिंग कुटुबियांवर शोककळा पसरली होती.