सफाईच्या बहाण्याने बारा लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर हातसफाई

कंपनीच्या तीन कर्मचार्‍यांना चोरीच्या मुद्देमालासह अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – दिवाळीनिमित्त घरी साफसफाईसाठी बोलाविलेल्या एका खाजगी कंपनीच्या चार कर्मचार्‍यांनी सफाईच्या बहाण्याने घरातील कपाटातून सुमारे बारा लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर हातसफाई केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिन्ही तीन कर्मचार्‍यांना मालाड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला असून चोरीच्या याच गुन्ह्यांत सध्या तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहे. सत्यम राजेश शुक्ला, अनिश ब्रिजभूषण चोधरी आणि पवन ओमप्रकाश धिवार ऊर्फ राहुल गौड अशी तिघांची नावे अरहेत. या गुन्ह्यांत अन्य एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला नोटीस देऊन त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

विश्रांती खराडे ही महिला तिचे पती वसंत, दोन मुली विनया आणि विशाखा यांच्यासोबत मालाडच्या कुंभारवाडा, फाल्कन टॉवरमध्ये राहते. तिचे पती सेवानिवृत्त झाले तर विनया ही आयटी क्षेत्रात व विशाखा ही मालाडच्या एका खाजगी कंपनीत एचआर म्हणून कामाला आहे. दिवाळीनिमित्त घरातील साफसफाईसाठी तिच्या मुलीने होम ट्रँगल कंपनीला कॉल करुन ऑनलाईन बुकींग केली होती. यावेळी कंपनीने २६ ऑक्टोंबरला सकाळी कंपनीचे कर्मचारी तिच्या घरी येणार असल्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे सकाळी कंपनीचे चार कर्मचारी कामासाठी आले होते. यावेळी घरात विश्रांतीसह तिचे पती आणि लहान मुलगी होती. त्यांनी घरातील कोणकोणत्या भागाची सफाई करायची आहे असे विचारणा केल्यानंतर त्यांनी त्यांना दोन बेडरुम, दोन बाथरुम, किचन आणि हॉलच्या सफाईची माहिती दिली होती. दुपारी दिडपर्यंत त्यांनी दिलेले काम पूर्ण केले होते.

मास्टर रुमची सफाई करताना त्यांनी आतून लॉक केले होते. त्यानंतर जवळपास दहा मिनिटे त्यांनी रुमची सफाई केली होती. काही वेळानंतर ते चौघेही एका कामगाराला सोडण्यासाठी तसेच वडापाव खाण्यासाठी घरातून निघून गेले. पंधरा मिनिटांनी त्यापैकी दोनजण परत आले. घरातील सर्व साफसफाई झाल्यानंतर तिच्या मुलीने त्यांना ऑनलाईन अडीच हजार रुपये ट्रान्सफर केले होते. उर्वरित काम नंतर करतो असे सांगून ते निघून गेले आणि परत आले नाही. यावेळी विश्रांतीने त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. नंतर त्यांचा मोबाईल बंद येत होता. २८ ऑक्टोंबरला विश्रांतीने तिच्या कपाटाची पाहणी केली असता तिला कपाटातील सोन्याचे, चांदीचे दागिने असा सुमारे बारा लाखांचा मुद्देमाल मिसिंग असल्याचे दिसून आले. संपूर्ण कपाटाची पाहणी केल्यानंतर तिला कुठेच दागिने सापडले नाही. साफसफाई करण्यासाठी आलेल्या कर्मचार्‍यांनी सफाईच्या नावाने तिच्या घरातील कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर हातसफाई केली होती.

हा प्रकार लक्षात येताच तिने मालाड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. संबंधित कंपनीकडून चारही आरोपींची माहिती प्राप्त करुन त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्क्त सुनिल जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास लोकरे, पोलीस निरीक्षक संजय बेडवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमर शिंदे, पोलीस हवालदार सातवसे, सावंत, जाधव, पोलीस शिपाई डोईफोडे, आमटे, थोरात, तांत्रिक मदत करणारे पोलीस हवालदार विवेक तावडे आदी पोलीस पथकाने विरारच्या नायगाव परिसरातून पवन, अनिश आणि सत्यम या तिघांना ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यांनी सफाईच्या नावाने तक्रारदार महिलेच्या घरातील कपाटातून बारा लाखांचा मुद्देमालावर हातसफाई केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. यातील सत्यम आणि अनिश हे दोघेही नालासोपारा येथे राहत असून मजुरीचे काम करतात. पवन धीवार हा या गुन्ह्यांतील मुख्य आरोपी असून तो हाऊसकिपिंग कॉन्ट्रक्टर म्हणून काम करतो. त्यानेच इतर तिघांच्या मदतीने ही चोरी केली होती. या गुन्ह्यांत अन्य एका अल्पवयीन मुलाचा सहभाग उघडकीस आला. त्याला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नंतर त्याला नोटीस देऊन त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या तिघांकडून पोलिसांनी चोरीचे अकरा लाखांचे सोन्याचे तर एक लाखांचे चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहे का, त्यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का याचा पोलिसांकउून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page