मालवणीनंतर मलबार हिल येथे पतीकडून पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरुन हत्या करुन पतीचे पलायन

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ मे २०२४
मुंबई, – मालवणी येथे चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच अशीच दुसरी घटना शनिवारी रात्री उशिरा मलबार हिल परिसरात घडली. अंजली अजय वर्दम या ३६ वर्षांच्या महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करुन तिच्याच पतीने हत्या करुन पलायन केले. हत्येनंतर सासू आशा वर्दम हिने पुरावा नष्ट करताना हा अपघात असल्याचा बनाव करुन मलबार हिल पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र शवविच्छेदन अहवालात ही हत्या असल्याचे उघडकीस येताच आरोपी पती अजय वर्दम आणि सासू आशा वर्दम यांच्याविरुद्ध मलबार हिल पोलिसांनी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत रविवारी आशा वर्दमला पोलिसांनी अटक केली तर हत्येनंतर पळून गेलेला आरोपी पती अजयचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. चारित्र्याच्या संशयावरुन ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आली आहे.

ही घटना शनिवारी रात्री उशिरा मलबार हिल येथील बाणगंगा परिसरात घडली. याच ठिकाणी अंजली ही तिच्या कुटुंबियांसोबत राहत होती. अजय हा तिचा पती तर आशा सासू आहे. काही दिवसांपासून तो अंजलीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून होणार्‍या वादातून त्याच्याकडून तिचा मानसिक व शारीरिक शोषण सुरु होता. शनिवारी रात्री उशिरा अजय हा नेहमीप्रमाणे मद्यप्राशन करुन घरी आला. यावेळी क्षुल्लक वादातून त्याने पुन्हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपास गेला की रागाच्या भरात अजयने अंजलीच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यात ती जागीच कोसळली. या घटनेनंतर भयभीत झालेल्या अजयने घरातून पलायन केले. दुसरीकडे रक्तबंबाळ झालेल्या अंजलीला तिच्या सासूने जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हॉस्पिटलमधून ही माहिती प्राप्त होताच मलबार हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांना दिलेल्या जबानीत आशाने अंजली ही चालताना खाली पडली आणि तिच्या गळ्यावर दुखापत झाल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला होता. त्याचा अहवाल रविवारी पोलिसांना प्राप्त झाला. त्यात अंजलीच्या गळ्यावर चाकूने जोरात वार झाल्याने दुखापत झाल्याचे उघडकीस आले. ही हत्या असल्याचे उघडकीस येताच आशाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या चौकशीदरम्यान तिने घडलेला प्रकार सांगून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर अजय आणि आशा या दोघांविरुद्ध पोलिसांनी हत्येसह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत रविवारी आशाला पोलिसांनी अटक केली. अजय हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page