सिगारेटच्या वादातून 28 वर्षांच्या फालुदा विक्रेत्याची हत्या

हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपीला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 मार्च 2026
मुंबई, – सिगारेटवरुन झालेल्या क्षुल्लक वादातून मोहम्मद वाहिद मुसीबुल शेख या 28 वर्षांच्या फालुदा विक्रेता तरुणाची त्याच्याच मित्राने तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केल्याची घटना मानखुर्द परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच शरफुद्दीन शहाबुद्दीन खान ऊर्फ फोटोभाई या 26 वर्षांच्या आरोपीस मानखुर्द पोलिसांनी अटक केली. हत्येच्या याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून त्याची चौकशी सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु घोरपडे यांनी सांगितले.

ही घटना मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजता मानखुर्द येथील मंडाळा, 30 फुट रोड, इंदिरानगर गल्ली क्रमांक एकच्या शिवमंदिर रोडवर घडली. मोहम्मद शाहिद मुसीबुल शेख हे हॉटेल व्यावसायिक असून ट्रॉम्बे, चिता कॅम्प परिसरात राहतात. त्यांचा ए वन सिक पराठा नावाचे एक हॉटेल आहे. मानखुर्दच्या मंडाळा परिसरात त्यांचा भाऊ मोहम्मद वाहिद हा त्याची पत्नी रिझवाना आणि मुलांसोबत राहतो. याच परिसरात तो फालुदाची हातगाडी लावतो. त्यातून त्याच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालत होता. शरफुद्दीन हा त्याचा परिचित असून ते दोघेही चांगले मित्र आहेत.

सोमवारी 9 मार्चला दुपारी बारा वाजता मोहम्मद वाहिद आणि शरफुद्दीन हे दोघेही मंडाळा येथील गल्ली क्रमांक 14, शिवनेरी विद्यालयासमोर होते. यावेळी मोहम्मद वाहिदने त्याला सिगारेट आणण्यास सांगितले. त्याने त्याला तुझ्यासाठी मी सिगारेट का आणू, तु तुझ्या पैशांनी सिगारेट खरेदी कर असे सांगितले. याच कारणावरुन त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि शरफुद्दीनने मोहम्मद वाहिदला बेदम मारहाण केली होती. हा प्रकार तिथे उपस्थित लोकांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.

यावेळी तेथून जाताना शरफुद्दीनने मोहम्मद वाहिदला जिवे मारण्याची धमकी दिली होती. मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजता इंदिरानगर, शिवमंदिर रोडवर मोहम्मद वाहिद होता. यावेळी तिथे शरफुद्दीन आला आणि त्याने काही कळण्यापूर्वीच जुन्या वादातून मोहम्मद वाहिदवर चाकूने वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. रक्तबंबाळ झालेल्या मोहम्मद वाहिदला स्थानिक रहिवाशांनी तातडीने शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु घोरपडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मोहम्मद शाहिद यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शरफुद्दीनविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीला काही तासांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु असून गुन्ह्यांतील हत्यार लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page