सतरा वर्षांच्या मुलीला मित्राने पेट्रोल पेटवून दिले
मुलीची प्रकृती चिंताजनक; मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 मार्च 2025
मुंबई, – सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पेट्रोल ओतून तिला तिच्याच तीस वर्षांच्या मित्राने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेत बळीत मुलगी 60 ते 65 तर आरोपी मित्र 40 ते 45 टक्के भाजला असून या दोघांवर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मुलीची प्रकृती गंभीर असून तिला वाचविण्यासाठी डॉक्टर शर्थीने प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी जितू नावाच्या आरोपी मित्राविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेने अंधेरीतील मरोळ परिसरात एकच खळबळ उडाली होती.
38 वर्षांची तक्रारदार महिला ही अंधेरीतील मरोळ परिसरात राहते. तिचे पती चालक म्हणून तर मुलगा एका खाजगी कंपनीत कामाला आहे. तिला तीन मुली असून त्यात दोन मुली जुळ्या आहेत. तिची मोठी मुलगी सतरा वर्षांची असून तिचे जितू नावाच्या एका तीस वर्षांच्या तरुणासोबत मैत्री होती. त्यामुळे ते दोघेही परिसरात भेटत होते. सहा महिन्यांपूर्वी या दोघांना परिसरात फिरताना काही स्थानिक लोकांनी पाहिले होते. याबाबत त्यांनी तक्रारदार महिलेला सांगितले होते. त्यामुळे तिने तिच्या मुलीला जाब विचारला असता तिने त्यांच्यात तसे काहीही नसल्याचे सांगून विषय टाळण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर तिने जितूला तिच्या मुलीसोबत फिरण्यास मनाई केली होती. रविवारी जेवण केल्यानंतर तिची मुलगी तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. रात्री साडेअकरा वाजता तिथे जितू आला आणि त्याने तिच्यावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. त्यात तिच्यासह जितू असे दोघेही गंभीररीत्या भाजले होते.
हा प्रकार निदर्शनास येताच स्थानिक रहिवाशांनी या दोघांची आग विझविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर या दोघांनाही तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आगीत ही मुलगी 60 ते 65 तर जितू हा 40 ते 45 टक्के भाजला असून या दोघांवर बर्निंग विभागात उपचार सुरु आहे. मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते. तिच्या चेहरा, मान, पोट, दोन्ही हात, पाय आणि पाठीला गंभीर भाजल्याच्या जखमा आहेत. या मुलीकडे तिच्या आईने चौकशी केली असता तिने ती तिच्या मैत्रिणीसोबत बसली होती. यावेळी तिथे जितू आला आणि काहीही कारण नसताना त्याने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे सांगितले.
तोंडाला भाजल्याने तिला बोलताना येत नाही. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तक्रारदार महिलेसह तिच्या भाजलेल्या मुलीची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. या जबानीनंतर जितूविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावरही कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे.
प्राथमिक तपासात गेल्या काही दिवसांपासून ही मुलगी जितूसोबत बोलत नव्हती. तिच्या कॉलला प्रतिसाद देत नव्हती. त्याचा जितूला राग होता. त्यामुळे तिला त्याचा जाब विचारण्यासाठी तो तिच्या घराजवळ गेला होता. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यानंतर त्याने त्याच्यासोबत आणलेल्या पेट्रोलने तिला पेटवून दिले होते. त्यात तोदेखील गंभीररीत्या भाजला होता.