मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ डिसेंबर २०२४
मुंबई, – विक्रीसाठी घेतलेल्या सुमारे तेरा लाखांच्या महागड्या मोबाईलचा अपहार करुन एका मोबाईल व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार डोंगरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी ताहा युसूफ मुल्ला या व्यावसायिकाविरुद्ध डोंगरी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांत ताहाला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.
डोंगरीतील रहिवाशी असलेले तमजीद अन्वर शम्शी यांचा मोबाईल खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. ते होलसेलमध्ये अनेक मोबाईल विक्रेत्यांना मोबाईलची विक्री करत असून त्यांचा डोंगरीतील निशाणपाडा परिसरात एक मोबाईल शॉप आहे. ताहा हा त्यांचा परिचित मोबाईल व्यावसायिक आहे. ४ ऑक्टोंबर ते ८ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत त्याने त्यांच्या मोबाईल शॉपमधून सुमारे तेरा लाखांचे ३४ हून अधिक महागडे मोबाईल विक्रीसाठी घेतले होते. महिन्यांभरात पेमेंट देण्याचे आश्वान देऊन तो निघून गेला होता. मात्र दोन महिने उलटूनही त्याने मोबाईल परत केले नाही किंवा मोबाईलचे पेमेंट दिले नाही. विचारणा केल्यानंतर तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. विविध कारण सांगून त्यांची दिशाभूल करत होता.
ताहाकडून फसवणुक होत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी डोंगरी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध दोन दिवसांपूर्वी डोंगरी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. ताहा याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.