मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – बाईकवरुन मोबाईल चोरी करुन धूम स्टाईलने पळून जाणार्या एका दुकलीस खार पोलिसांनी अटक केली. सिद्धार्थ रुपेश पाटील आणि सादिक झाकीर शेख अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे एक लाख ऐंशी हजार रुपयांचे तीन चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. या दोघांनी अलीकडेच एका सिनेअभिनेत्रीचा मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली होती. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांच्या अटकेने मोबाईल चोरीचे इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी वर्तविली आहे.
एमी एला कौलर ही अभिनेत्री असून ती खार येथील चौदावा रस्ता परिसरात राहते. २९ ऑक्टोंबरला ती तिच्या मित्रासोबत कामानिमित्त बाहेर जात होती. यावेळी बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी तिचा पर्स हिसकावून चोरी करुन पलायन केले होते. त्यात तिचा आयफोन होता. घडलेला प्रकार तिने खार पोलिसांना सांगून दोन्ही तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल खार पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकराव पोळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैभव काटकर, पोलीस उपनिरीक्षक कुंभारे, अंमलदार भरत काच्चे, दिनेश शिर्के, आनंद निकम, योगेश तोरणे, महेश लहामगे, अजीत जाधव, मयुर जाधव, अभिजीत कदम, मनोज हांडगे यांनी मोबाईल चोरी करुन पळून गेलेल्या सिद्धार्थ पाटील आणि सादिक शेख या दोघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
चौकशीदरम्यान त्यांनीच तक्रारदार अभिनेत्रीचा आयफोन चोरी केल्याची कबुली दिली. या आयफोनसह इतर दोन गुन्ह्यांतील तीन मोबाईल त्यांच्याकडून पोलिसांनी जप्त केले. दोन्ही आरोपी अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत. ते दोघेही मोबाईल चोरीसाठी बाईकचा वापर करतात. त्यांनी खार आणि वांद्रे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याविरुद्ध इतर पोलीस ठाण्यातही अशाच काही गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्या चौकशीतून अशाच काही गुन्ह्यांची उकल होणार आहे.