विविध राज्यात इलेक्ट्रीक काम देतो सांगून फसवणुक
गुजरातच्या 64 वर्षांच्या वयोवृद्ध आरोपीविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मार्च 2025
मुंबई, – विविध राज्यात इलेक्ट्रीक काम देतो असे सांगून एका वयोवृद्धाची त्याच्याच परिचित व्यावसायिकाने सुमारे दहा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार फोर्ट परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मनोहरसिंग वाघेला 64 वर्षांच्या वयोवृद्ध आरोपीविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तो मूळचा गुजरातच्या अहमदाबाद, सायन सिटी रोडचा रहिवाशी आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांची एक टिम लवकरच गुजरातला जाणार आहे.
67 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार व्यापारी आहेत. ते मलबार हिल येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांची मनोहरसिंग याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्याने त्यांना विविध राज्यात इलेक्ट्रीक कामाची ऑर्डर मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्याने त्यांच्याकडे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून दहा लाखांची मागणी केली होती. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याच्या बँक खात्यात दहा लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांना कामाची ऑर्डर न देता, त्यांनी दिलेल्या सिक्युरिटीचा डिपॉझिटचा अपहार करुन फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने त्यांना दहा लाख रुपये परत केले नाही. त्यामुळे त्यांनी मनोहरसिंग वाघेला याच्याविरुद्ध एमआरए मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.