दहा लाखांचे सोन्याचे कॉईनसह ब्रेसलेट चोरी करुन पलायन

44 वर्षांच्या आरोपी केअरटेकरविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 फेब्रुवारी 2026
मुंबई, – सुमारे दहा लाखांचे सोन्याचे दहा कॉईन आणि एक ब्रेसलेट असा मुद्देमाल चोरी करुन घरातील केअरटेकरने पलायन केल्याची घटना मुलुंड परिसरात उघडकीस आली आहे. सुनिल चेतराम चौधरी असे या 44 वर्षीय आरोपी केअरटेकरचे नाव असून त्याच्याविरुद्ध मुलुंड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. चोरीनंतर सुनिल हा त्याच्या मध्यप्रदेशातील गावी पळून गेल्याची शक्यता असल्याने त्याच्या अटकेसाठी मुलुंड पोलिसांची एक टिम लवकरच मध्यप्रदेशला जाणार आहे.

अभिषेककुमार विवेक शर्मा हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मुलुंडच्या जटाशंकर रोड, लोकएव्हरेस्ट अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा शिपिंग आणि लॉजिस्टिकचा व्यवसाय आहे. नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचे वडिल विवेक शर्मा यांना ब्रेन स्टोक झाला होता. तेव्हापासून ते घरी असतात. त्यांची देखभाल करण्यासाठी त्यांना एका केअरटेकरची गरज होती. त्यामुळे त्यांच्या परिचित व्यक्तीच्या शिफारशीवरुन त्यांनी त्यांच्याकडे सुनिल चौधरी याला केअरटेकर म्हणून नोकरीस ठेवले होते. सुनिल हा मूळचा मध्यप्रदेशच्या जबलपूर, पानाघरचा रहिवाशी असून सध्या तो मुंबई शहरात वास्तव्यास होता.

25 नोव्हेंबर 2025 पासून त्यांच्याकडे पूर्णवेळ केअरटेकर म्हणून काम करत होता. त्यांच्या वडिलांच्या बेडरुममध्ये झोपत होता. अभिषेककुमार यांनी त्यांच्या उत्पनातून काही सोन्याचे कॉईन आणि ब्रेसलेटवर गुंतवणुक केली होती. त्यांच्याकडे प्रत्येकी दहा तोळ्याचे सोळा सोन्याचे कॉईन आणि चाळीस ग्रॅम वजनाचे एक ब्रेसलेट होते. ते कॉईन आणि ब्रेसलेट त्यांनी त्यांच्या कपाटात ठेवले होते. 19 फेब्रुवारीला त्यांनी कपाटातील कॉईन आणि ब्रेसलेटची पाहणी केली असता त्यात सोळा कॉईन आणि ब्रेसलेट नव्हते. त्यामुळे त्यांनी कपाटात सर्वत्र पाहणी केली, मात्र त्यांना कपाटात कुठेच सोन्याचे कॉईन आणि ब्रेसलेट सापडले नाही.

केअरटेकर म्हणून काम करणारा सुनिल चौधरी हादेखील घरी नव्हता. वडिलाकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी सुनिल हा त्याची पत्नी आजारी असल्याचे सांगून 4 फेब्रुवारीलाच त्याच्या मध्यप्रदेशातील गावी गेल्याचे समजले. या दरम्यान त्यांच्या घरी इतर कोणीही त्रयस्थ व्यक्ती आला नव्हता. सुनिलला मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर त्याने चोरीबाबत उडवाउडवीचे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही चोरी सुनिल चौधरी यानेच केली असून चोरीनंतर तो पळून गेल्याचा त्यांना संशय होता.

त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार मुलुंड पोलिसांना सांगून सुनिल चौधरीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. सुनिल हा त्याच्या मध्यप्रदेशातील गावी गेल्याने मुलुंड पोलिसांची एक टिम लवकरच तिथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page