मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 जून 2025
मुंबई, – नागपाडा आणि कांदिवली परिसरात दोन अल्पवयीन मुलीवर त्यांच्याच परिचित व्यक्तींनी लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नागपाडा आणि चारकोप पोलिसांनी दोन स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन एका 65 वर्षांच्या वयोवृद्धाला अटक केली तर दुसरा आरोपी पळून गेला आहे. अटकेनंतर आरोपीला दिडोशीतील विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील पिडीत मुलगी चौदा वर्षांची असून ती नागपाडा परिसरात राहते. 30 वर्षांचा आरोपी हा तिचा चुलता आहे. बुधवारी 11 जूनला सकाळी साडेदहा वाजता ती तिच्या घरी झोपली होती. यावेळी तिथे आरोपी आला आणि त्याने तिचे तोंड दाबून तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी धमकी देऊन तो तेथून पळून गेला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने नागपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी चुलत्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
दुसरी घटना कांदिवलीतील चारकोप परिसरात घडली. याच परिसरात 32 वर्षांची तक्रारदार महिला राहत असून पिडीत तिची सात वर्षांची पुतणी आहे. तिच्या आई-वडिलांचा कोरोनामध्ये मृत्यू झाला होता. तेव्हापासून ती तिच्या काकीसोबत राहत होती. बुधवारी 11 जूनला सायंकाळी सात वाजता ती जवळच्या सार्वजनिक शौचालयात गेली होती. यावेळी तिथे 65 वर्षांचा आरोपी वयोवृद्ध आला आणि त्याने पिडीत मुलीशी अश्लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. घरी आल्यानंतर तिने तक्रारदार महिलेला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिने आरोपीविरुद्ध चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच वयोवृद्ध आरोपीला पोलिसांनी अटक केली. आरोपी याच परिसरात राहत असून त्याचा खेळणी विक्रीचा व्यवसाय असल्याचे पोलिसांनी सांगितले.