अडीच कोटीचे तीन किलो सोने घेऊन चोरट्याने पलायन

गुन्हा दाखल होताच संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 जून 2025
मुंबई, – नागपाडा येथे भरस्त्यात सुमारे अडीच कोटीचे तीन किलो सोने घेऊन अज्ञात चोरट्याने पलायन केल्याची घटना नागपाडा परिसरात घडली. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी रॉबरीचा गुन्हा नोंदवून काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या संशयितांची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या आरोपींकडून लवकरच चोरीचे सर्व सोने हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना गुरुवारी 12 जूनला सकाळी पावणेनऊ वाजता नागपाडा येथील डायना ब्रिज, नवजीवन सोसायटीजवळ घडली. राजन शांताराम पावसकर हे नवी मुंबईतील पनवेल, विचूंबे गाव, साईप्रसाद अपार्टमेंटमध्ये राहतात. लोअर परेल येथील एका ज्वेलर्स कंपनीत राजन हे कामाला आहे. गुरुवारी सकाळी ते त्यांच्या पुतण्या तेजससोबत त्याच्या बाईकवरुन दिड तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि दिड तोळ्याचे बिस्कीट असे 2 कोटी 55 लाख रुपयांचे तीन किलो सोने घेऊन जात होते.

त्यांची बाईक नागपाडा येथील डायना ब्रिज, नवजीवन सोसायटीजवळ येताच अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी धक्काबुक्की करुन सोने असलेली बॅग घेऊन पलायन केले होते. त्यांनी आरडाओरड करुन त्यांचा पाठलाग केला, मात्र ते सर्वजण पळून गेले होते. घडलेला प्रकार कंपनीच्या मालकाला सांगून त्यांनी नागपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून राजन पावसकर यांनी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध रॉबरीचा गुन्हा दाखल केला होता.

या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. या पथकाने सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून या रॉबरीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्या चौकशीतून इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या आरोपींकडून लवकरच चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलीस सूत्राने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page