मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ डिसेंबर २०२४
मुंबई, – गेटवेहून एलिफंटा बेटावर जाणार्या निलकमल बोटीवरील झालेल्या दुर्घटनेप्रकरणी नेव्ही क्राफ्ट चालकाविरुद्घ रात्री उशिरा कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात निष्काळजीपणामुळे मृत्यू, वैयक्तिक सुरक्षा व इतरांच्या जिवाला धोका निर्माण करणारी कृती, जहाजावर घाईगडबडीने, निष्काळजीपणाने नेव्हिगेशन आणि व्यक्तीचे चुकीचे नुकसान, नुकसान करणार्या गैरकृत्य आदी कलमांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकरणाची कुलाबा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे.
गेटवे ऑफ इंडियाला भेट देण्यासाठी देशाच्या विविध शहरातून पर्यटक येतात आणि तेथून लहान फेरीसाठी एलिफंटा बेटासारख्या पर्यटन स्थळाला देतात. गुरुवारी एलिफंटाला जाणार्या एका प्रवाशी बोटीला नौदलाच्या एका नौकाने धडक दिली होती. यावेळी निलकमल नावाची प्रवाशी बोट पलटी झाली आणि त्यात काही प्रवाशांसह इतरजण पाण्यात बुडू लागले होते. या घटनेची माहिती भारतीय नौदलासह मुंबई पोलीस, स्थानिक मच्छिमारांनी बुडणार्या ११५ जणांना बाहेर काढले होते. या सर्वांना नंतर विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात जेएनपीटी ५७, आयएनएचएस संघानी करंजा येथे १२ नौदल डॉकयार्ड ३१, सेंट जॉर्ज ९, आयएनएस आश्विनी आणि जे जे रुग्णालयात प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. त्यापैकी तेराजणांना मृत घोषित करण्यात आले.
मृतांमध्ये नाशिकच्या निधिश राकेश अहिरे (८), राकेश नानाजी अहिरे (३४), हर्षदा राकेश अहिरे (३१), धुळ्याची माही साईराम पावरा (३) गोव्याची शफीना अशरफ पठाण (३४), प्रविण रामनाथ शर्मा (३४), मंगेश महादेव केळशीकर (३३), मोहम्मद रेहमान कुरेशी (३५), नालासोपारा येथील रमारतीदेवी गुप्ता (५०), नेव्हीनगर, नेव्हल स्टेशन करंजाचे महेंद्रसिंग विजयसिंग शेखावत (३१), नवी मुंबईच्या नेरुळ येथील प्रज्ञा विनोद कांबळे (३९), नौदल अधिकारी टी दिपक (४५) आणि गोवंडीचे दिपक निळकंट वाकचोरे (५०) यांचा समावेश आहे. ४३ वर्षीय हंसराज भाटी आणि सात वर्षांचा जोहान मोहम्मद निसार अहमद पठाण यांचा बेपत्ता प्रवाशांमध्ये समावेश होता. रात्री उशिरा हंसराज भाटी यांचा मृतदेह सापडला, जोहानचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले.
दोन्ही जहाजातील ११३ जणांपैकी तेराजणांचा मृत्यू झाला तर ९८ जणांना वाचविण्यात यश आले आहे. फेरी बोटीत क्षमतेपक्षा अधिक प्रवाशांना नेण्यात आले होते. बोटीत सहा क्रु मेबर्ससह ८४ प्रवाशी घेऊन जाण्याची परवानगी होती. तरीही बोटीतून शंभरहून अधिक प्रवाशी प्रवास करत असल्याचे तपासात उघडकीस आले. बोटीशी संबंधित सर्व कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या दुर्घटनेनंतर गुरुवारी गेटवेहून बोटीतून प्रवास करणार्या सर्व प्रवाशांना लाईट जॅकेट बंधनकारक करण्यात आले आहे. लाईफ जॅकेटचा प्रवाशांनी कसा वापर करावा यासाठी विशेष माहिती देण्यात येणार आहे. रात्री उशिरा कुलाबा पोलिसांनी नेव्ही क्राफ्ट चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या तपासाचा अहवाल लवकरच वरिष्ठांना सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर हा अहवाल गृहविभागाला सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.