मनी लॉड्रिुंगप्रकरणी डिजीटल अरेस्टची धमकी देऊन १.१० कोटींना गंडा
सायबर ठगांना बँक खाते पुरविणारा खाजगी कंपनीचा संचालक गजाआड
अरुण सावरटकर
४ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अरेस्टची धमकी देऊन बोरिवलीतील एका नामांकित कंपनीतून निवृत्त झालेल्या वयोवृद्धाची १ कोटी १० लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी एका मुख्य आरोपीस उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल विभागाने अटक केली. वृषभनाथ धनपाल तारदाळे असेया आरोपीचे नाव असून तो मूळचा कर्नाटकचा रहिवाशी आहे. वृषिका ऍग्री ऍण्ड डेअरीटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा तो संचालक असून त्याने कंपनीच्या नावाने एक बँक खाते उघडले होते, याच खात्यात फसवणुकीची ७१ लाखांची रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
हरिवंदन डाहयाभाई टेलर हे ७९ वर्षांचे वयोवृद्ध अंधेरीतील आझाद नगर परिसरात राहतात. बोरिवलीतील एका नामांकित खाजगी कंपनीतून निवृत्त झाले असून सध्या ते घरीच असतात. २५ सप्टेंबरला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या आधारकार्डवरुन नाशिक येथील एका बँकेत खाते उघडण्यात आले असून त्यात कोट्यवधी रुपयांची मनी लॉड्रिंग घोटाळा झाला आहे. प्राथमिक तपासात हा संपूर्ण घोटाळा पंधरा कोटीचा असून त्यांना दोन कोटी रुपयांचे कमिशन प्राप्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याचीच चौकशी सुरु आहे. त्यांनी तपासात सहकार्य केले नाहीतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल असे सांगितले.
या प्रकाराने ते प्रचंड घाबरले. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची त्याचा काहीही संबंध नाही, त्यांचा नाशिकच्या कुठल्याही बँक खाते नाही. त्यांना कधीच दोन कोटी मिळाले नाही असे सांगितले. यावेळी संबंधित व्यक्तीने व्हिडीओ कॉलद्वारे त्यांची चौकशी केली. ही एक गोपनीय चौकशी आहे, त्यामुळे चौकशीबाबत कोणाशी चर्चा करु नका, इतकेच नव्हे तर घरीही कोणाला काहीही सांगू नका, त्यांनी नियमांचे उल्लघंन केले तर त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर अटकेची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी चौकशीबाबत कोणालाही काहीही सांगितले नाही. चौकशीचा एक भाग म्हणून त्यांनी त्यांच्या बँक खात्यासह इतर गुंतवणुक आणि प्रॉपटीबाबत विचारणा केली. त्यांना वेगवेगळ्या चार बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास केले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ही रक्कम परत पाठविली जाईल असे सांगितले. त्यामुळे चार वेगवेगळ्या बँक खात्यात २९ लाख, ४२ लाख, ९ लाख ५० हजार आणि ३० लाख असे १ कोटी ५० लाख ५० हजार ट्रान्स्फर केले होते.
डिजीटल अरेस्टची कारवाई झाल्याने त्यांची संबंधित पोलीस अधिकारी दोन तासांनी चौकशी करत होते. नंतर त्यांनी चौकशी बंद केली होती.हा प्रकार त्यांनी त्यांच्या सोसायटीच्या एका पदाधिकार्याला सांगितला होता. त्याने त्यांची सायबर डिजीटल फ्रॉड झाल्याचे सांगून त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी संबंधित् सर्व मोबाईल क्रमांक ब्लॉक करुन त्यांची उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान या गुन्ह्यांतील रक्कम चार वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. त्यापैकी ७१ लाखांची रक्कम वृषभनाथ तारदाळे याच्या वृषिका ऍग्री ऍण्ड डेअरीटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाने उघडण्यात आलेल्या कंपनीच्या बँक खात्यात वळविण्यात आली.
पैसे ट्रान्स्फर होताच त्याने ती रक्कम या कटातील मुख्य आरोपींना ऑनलाईन पाठविली. तपासात आलेल्या या माहितीनंतर सायबर सेलची एक टिम कर्नाटक येथे गेली होती. या पथकाने गांधीनगरच्या दुसरी क्रॉस लेन, रत्नत्रय निलया अपार्टमेंटमध्ये राहणार्या वृषभनाथ तारदाळे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला. वृषभनाथ हा कर्नाटकच्य बेळगावी, गोकाक, गांधीनगरचा रहिवाशी आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने वृषिका ऍग्री ऍण्ड डेअरीटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी उघडली होती. या कंपनीचा संचालक म्हणून त्याने दस्तावेज बनविले होते. त्यानंतर त्याने कर्नाटकमधील एका बँकेत कंपनीच्या नावाने एक करंट खाते उघडले होते.
दिया नावाच्या एका महिलामार्फत त्याने कटातील मुख्य सायबर ठगांना कंपनीच्या बँक खात्याची माहिती दिली होती. बँक खात्याची माहिती प्राप्त होताच इतर चार आरोपींनी फसवणुकीच्या रक्कमेपैकी ७१ लाख रुपये त्याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम सायबर ठगांना पाठविल्यानंतर त्याला लाखो रुपयांचे कमिशन मिळाले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत तोतया पोलीस अधिकारी संजय याच्यासह इतर काही बँक खातेदारांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.