कौटुबिक वादातून पत्नीची पतीकडून गळा आवळून हत्या

हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपी पतीला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – कौटुंबिक वादातून पत्नीची पतीने ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केल्याची घटना धारावी परिसरात घडली. गुलनाज खातून मोकिम अहमद खान असे हत्या झालेल्या ३३ वर्षीय महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी आरोपी पती मोकिम अहमद अब्दुल गनी खान (३९) याला शाहूनगर पोलिसांनी अटक केली. दारु पिण्यावरुन झालेल्या वादानंतर रागाच्या भरात मोकीमने त्याच्या पत्नीची हत्या केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रहमतमुल्ला सय्यद यांनी सांगितले. हत्येच्या याच गुन्ह्यांत मोकीमला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना मंगळवारी रात्री नऊ वाजता धारावीतील ६० फिट रोड, इंदिरानगर, लकी चाळीत घडली. या चाळीतील रुम क्रमांक २१५ मध्ये मोकीम हा त्याची पत्नी गुलनाज आणि सहा वर्षांचा मुलगी अक्सा यांच्यासोबत राहतो. तो सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्याला दारु पिण्याचे व्यसन होते, त्यातून त्याचे गुलनाझसोबत सतत खटके उडत होते. मंगळवारी रात्री मोकीम हा नेहमीप्रमाणे दारुच्या नशेत घरी आला होता. घरी आल्यानंतर त्याचे गुलनाझसोबत क्षुल्लक कौटुंबिक कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर त्याने तिला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. या मारहाणीनंतर त्याने तिची तिने घातलेल्या ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली होती. या हत्येनंतर तो घरातून पळून गेला होता.

रात्री साडेनऊ वाजता स्थानिक रहिवाशांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला पती-पत्नीमध्ये वाद सुरु असून पत्नी ही बेशुद्ध पडली आहे. ही माहिती प्राप्त होताच सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र आडाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रहमतमुल्ला सय्यद यांच्यासह शाहूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. बेशुद्ध असलेल्या गुलनाझला पोलिसांनी तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. स्थानिक रहिवाशांच्या चौकशीतून गुलनाझ आणि मोकीम यांच्यात कौटुंबिक वाद झाला आणि त्यातून त्याने तिची हत्या केली होती, हत्येनंतर तो पळून गेला होता.

तपासात आलेल्या माहितीनंतर पोलिसांनी मोकीम खान याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना काही तासांत मोकीमला धारावी परिसरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page