सीआयएसएफच्या पोलीस हवालदाराची सायबर ठगाकडून फसवणुक

मोबाईल रिसेट करुन सर्व अ‍ॅप डिलीट करुन गंडा घातल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 जून 2026
मुंबई, – सीआयएसएफच्या एका पोलीस हवालदाराची अज्ञात सायबर ठगाने फसवणुक केल्याचा प्रकार माहीम परिसरात उघडकीस आला आहे. मोबाईल रिसेट करुन सर्व अ‍ॅप डिलीट करुन मोबाईल हॅक करुन ही फसवणुक झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी माहीम पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

जावेद अब्दुल गफार हे पनवेलच्या ओएनजीसी कॉलनीत राहत असून सध्या सीआयएसएफमध्ये हवालदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांची नेमणूक माहीमच्या माहीम पोलीस वसाहत, इमारत क्रमांक बाराच्या सीआयएसएफ कार्यालयात आहे. शनिवारी ते नेहमीप्रमाणे कामावर आले होते. दुपारी दोन वाजता त्यांना त्यांचा मोबाईल अचानक रिसेट होत असल्याचे तसेच त्यांच्या मोबाईलमधील सर्व अ‍ॅप आपोआप डिलीट होत असल्याचे दिसून आले. काही वेळानंतर त्यांचा मोबाईल सुरु झाला होता. त्यामुळे त्यांनी मोबाईलवर फोन पे अ‍ॅप पुन्हा डाऊनलोड करुन बँक खात्यातील शिल्लक पाहण्याचा प्रयत्न केला होता.

यावेळी त्यांना त्यांच्या बँक खात्यातून 95 हजार 668 रुपये डेबीट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी बँकेत जाऊन घडलेला प्रकार सांगून त्यांचे बँक खाते बंद करण्याची विनंती केली होती. बँक अधिकार्‍यांकडून त्यांचा मोबाईल हॅक करुन अज्ञात सायबर ठगांनी त्यांच्या बँक खात्यातून ही रक्कम डेबीट करुन ऑनलाईन फसवणुक केल्याचे सांगून त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी सायबर हेल्पलाईनसह माहीम पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या ठगाचा शोध सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page